सातार्यातील मनोमिलनाचा सस्पेंन्स आता जवळपास संपला आहे. सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी यांनी 40 उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या नगराध्यक्षा निश्चितीसह तयार केल्याने आमदार व खासदार गट यांनी समोरासमोर दंड थोपटले आहेत. मनोमिलनात उभी फुट पडण्यासाठी खा. उदयनराजे भोसले यांनी नगरविकासच्या दादा नगरसेवकांच्या नावावर आक्षेप नोंदवल्याने पडली आहे. अमोल मोहिते (माची पेठ), अविनाश कदम, जयवंत भोसले व जयेंद्र चव्हाण हे नगरविकास आघाडीचे बिनीचे उमेदवार व विद्यमान नगरसेवक सातारा विकास आघाडीला याच नावांची अॅलर्जी झाल्याने त्यांना हरकत घेेण्यात आली. उभय पक्षाची जी चर्चा सफल होत नाही त्यामध्ये दादा नगरसेवकांना वगळल्याचे कारण सांगितले जात आहे. कारण उदयनराजे समर्थक प्रशांत अहिरराव, किशोर शिंदे, अली शेख या उदयनराजें समर्थकांना राजकारणाच्या पटावर आणण्याचा शब्द दिला गेल्याने पेच वाढला आहे. मात्र दोन्ही आघाडयातील हे उमेदवार मातब्बर असल्याने नक्की थांबवायचे कुणाला कारण आता वेळ जवळपास संपली आहे. कोणीच कोणासाठी थांबणार नाही हे मनोमिलनाच्या राजकारणाचे उघड सत्य आहे. अदालतवाडयावर वडीलधारी मंडळींच्या समोर अनेक बैठका झाल्या. 25-15, 22-18,20-20 असे अनेक फॉर्म्युले चर्चेत आले. प्रसंगी थोरल्या बंधूचा मान ठेवत धाकटयांनी काही ठिकाणी लवचिक धोरण स्विकारले. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीच्या बारा वर्षाच्या वाटचालीत विचारपूर्वक राजकारण केले आहे. सातारा विकास आघाडीकडून ताठर अटीशर्ती ठेवल्या गेल्याने आणि यावेळी मनोमिलनातले पे्रम थोरले बंधू उदयनराजे यांनी जरा जास्तच ताणल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कदाचित आपले नाणे खणखणीतपणे वाजवून घेण्याची ती एक उदयनराजेंची पध्दत आहे. त्यामुळेच चर्चेच्या अनेक वाटाघाटी या निष्फळ ठरल्या आहेत. सातारा विकास आघाडीकडून सौ. आदिती चंद्रशेखर घोरपडे व नगरविकास आघाडीकडून शिवेंद्रराजे यांच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांची नावे निश्चित झाली आहेत.
राजघराण्यातील राजकारणाच्या दशा व दिशा कशा बदलत आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव सातारकर घेत आहेत. दहा वर्षापुर्वी सातार्याचा विकास आणि मनोमिलनाची राजकीय सोय ओळखून दोन्ही नेते एकत्र आले होते. मात्र एकमेकांमध्ये असणारे रूसवे फुगवे आणि अटीशर्तीचे बडेबडे खलिते याचा कशाचीच मेळ बसेनासा झाल्याने कदाचित दहा वर्षापुर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. तेव्हाही सातारकरांनी दोन्ही आघाडयांना 18-19 चा काठावरचा कौल दिला होता. आणि तिसरी आघाडी निर्णायक ठरू लागल्याने दोन्ही नेते वडीलधारी मंडळीच्या सल्याने एकत्र आले होते. यंदाही वडीलकीचा सल्ला ऐकण्यात आला. त्याला पुरेपुर मानही देण्यात आला. तरीसुध्दा राजकीय समीकरणांची किंवा कार्यकर्त्याचा वाढता दबाव झेलण्यासाठी राजकीय नात्याला अर्धविराम देण्यात आला आहे. पण कदाचित धक्कातंत्र पुढेही असू शकेल. विरोधकांना खिंडीत गाठून हतबल करण्याची ही वेगळी रणनिती असू शकते असे गणित राजकीय विश्लेषक मांडू लागले आहेत. आणि हा संदर्भ खा. उदयनराजे भोसले यांना तंतोतंत लागू पडतो. अचानकपणे एखादे नाव पुढे आणून त्याला पदावर विराजमान करण्याची उदयनराजेंची हातोटी विलक्षण आहे. तर नगरविकास आघाडी आधी चर्चा आणि मग निर्णय असे शिवेंद्रराजेंच्या कामाचे तंत्र आहे. सध्यातरी कागदावर दोन्हीकडून तुल्यबळ उमेदवार दिले गेल्याने बोगदा, माची, गुरूवार परज, शनिवार पेठ, गोडोली, करंजे येथे मनोमिलनातल्या दोन्ही आघाडयांच्या तुल्यबळ लढती पहावयास मिळणार आहेत. वेदांतिकाराजे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याने भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावण्याचे डावपेच आखले आहेत. सुवर्णाताई पाटील या कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याने पक्षाला मानणारे व सुवर्णाताईचे समर्थक यांच्या मतदानाचा फायदा निश्चित होणार आहे. त्याचबरोबर आदिती घोरपडे हे पण नाव वजनदार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडीत तिरंगी चुरस पहावयास मिळणार आहे.
दादा नगरसेवकांना वगळल्यानेच मनोमिलनात दरार
RELATED ARTICLES