मेढा( अभिजित शिंगटे) – “बोक्या सातबंडे “नाटकाने आपली छाप रसिकांवर टाकून मने जिंकली तर हाऊसफुल्ल गर्दीतही बालचमुनिही आपला आनंद व्यक्त करून या नाटकाला उत्तम प्रतिसाद दिल्याने हा नाट्य प्रयोग यशस्वी झाला असे चित्र दिसून आले.
सातारा येथिल शाहू कलामंदिर येथे बुधवारी सादर करण्यात आलेल्या या नाटकातील प्रत्येक कलाकाराने आपला दमदार अभिनय सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली आहे.
सातारा येथील चित्राज कल्चरल कट्टा च्या माध्यमातून हे नाटक आयोजित करण्यात आले . पुण्यात या नाटकाचा प्रयोग पाहताना चित्राज कल्चरल कट्टा च्या संस्थापिका व नावाजलेल्या निवेदिका चित्रा भिसे आणि अजित करडे यांना वाटले हे नाटक सातारकर प्रेक्षकांनी पहायला हवे ,मुलांनी रंगभूमीकडे यायला हवं याच उद्देशाने या नाटकाचे आयोजन केले आणि साताऱ्यात हाऊस फुल् गर्दी खेचून आणली .यासाठी सक्सेस अबॅकस चे संस्थापक किरण पाटील यांचे मुख्य प्रायोजकत्व होते तर ज्ञानछाया अकॅडमी च्या वसुधा घाडगे ,सैनिक स्कुल परीक्षेची तयारी करणाऱ्या अकॅडमी चे गजानन गोरे यांचे सह प्रायोजकत्व मिळाले.
मराठी चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे , रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध कलाकार आदरणीय दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित या नाटकाचे निर्माते दिनू पेडणेकर,राहुल कर्निक ,रणजित कामत,दिप्ती जोशी आहेत.
अनामिका, भूमिका आणि मिलाप थिएटरची निर्मिती असलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या नाटकाचे लेखन डॉ. निलेश माने यांनी केलं असून, विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाची दृष्य-संकल्पना केली आहे प्रणव जोशी यांनी तर , या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना राहूल जोगळेकर, संगीत निनाद म्हैसाळकर,गीते वैभव जोशी, नृत्ये संतोष भांगरे, वेशभूषा महेश शेरला, रंगभूषा कमलेश बिचे, साहसी दृश्ये राकेश पाटील यांचे असून सोबत असणारे सहकारी यांनी ही नाटकाकरिता अथक परिश्रम घेतले असल्याचे दिसून आले.
या नाटकाची सुरुवातच चांगल्या पध्दतीने करण्यात आली असून हे नाटक बोक्या , कुटुंब, मित्र परिवार यांतुन फुलत जाणारे आहे. नागरीकांनी आपली सामाजिक बांधिलकी न विसरता आपल्याला प्राणवायू देणाऱ्या वृक्षांवर प्रेम करावे,आपल्या स्वार्थासाठी झाडांची हत्या करण्यापेक्षा त्यांना वाढवावे असा कानमंत्र देतानाच प्राणी मात्रांवरही प्रेम करून समाजात कसे कार्यरत रहावे याची मांडणी करण्यात , मूळचे सातारचे असणाऱ्या लेखक डॉ . निलेश माने यांना यश मिळाले आहे. या नाटकाने प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली असून एक चांगले नाटक पाहण्यास मिळाले या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या नाटकाने लहानशा मुलांना आपलेसे करून घेतले आहे तर त्यांच्या सोबत असणारे पालकांनाही या बालनाट्य ने आपल्या कलाकृतीने आपलेसे केले आहे.