महाबळेश्वर -: जागतिक बाजारपेठेतील मंदी, अवकाळी पाऊस, सतत असणारे ढगाळ वातावरण आणि आता लॉक डाऊन फटका अशा चौफेर संकटामध्ये सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक अडकले आहेत.
या उत्पादकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून कोरोना मुळे स्ट्रॉबेरी हंगाम आर्थिक गर्तेत सापडला आहे. त्यातचं परदेशातून रोपे आली नाही तर पुढील वर्षीचा हंगाम धोक्यात येणार आहे. त्या दृष्टीने शासनाने तातडीने उपाययोजना केल्या तसेच स्ट्रॉबेरी उत्पादक तग धरू शकतात. महाबळेश्वर तालुक्यात सध्या दोन हजार सहाशे एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यातील अवकाळी .भिलार, लिंगमळा, मेटगुताड, राजापुरी ,गुरेघर ,किंगर, तळदेव, कुंभरोशी आणि आता वाई ,जावली ,कोरेगाव ,तालुक्यातही स्ट्रॉबेरीचे मोठ्या उत्पादन घेतले जाते. या वर्षी स्ट्रॉबेरी हंगाम सुरू होण्याअगोदरच जोरदार पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिका चे मोठे नुकसान झाले .त्यातूनही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. परंतु लागवड झाल्यानंतर जोरदार पावसाने स्ट्रॉबेरी पाण्याखाली गेली. लागवड झालेल्या क्षेत्रापैकी दहा टक्के क्षेत्रावरील रोपे खराब झाली. त्यामुळे लागवडीचे क्षेत्र घटले. तसेच वातावरणात होणाऱ्या वारंवार बदलांमुळे या पिकावर हानिकारक मोठा परिणाम झाला. त्यातच हंगामात स्ट्रॉबेरी उत्पादनाला सुरुवात झाली असतानाच वन्यप्राण्यांनी स्ट्रॉबेरी शेतीचे मोठे नुकसान केले.
दरम्यान महाबळेश्वर-पाचगणी ला येणाऱ्या पर्यटकांवर कोरोना संसर्गाने मोठा परिणाम झाला व त्याचा परिणाम स्ट्रॉबेरी विक्रीवर होऊ लागला. मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने स्ट्रॉबेरी पडून राहू लागली. त्यातच वाहतूक यंत्रणा पूर्ण बंद झाल्याने ही स्ट्रॉबेरी बाहेर पाठवता येत नाही व आता हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच फळे विक्री करता येत नसल्याने शेतकऱ्यांनी याची तोडणी बंद केली. त्यामुळे या फळांमुळे सध्या शेती लाल दिसत आहे .अशा अवस्थेत अनेक उत्पादकांनी ही फळे अखेर घरातील जनावरांना खाण्यासाठी दिली. आताही रोपे अशा अवस्थेतच काढून टाकावी लागणार आहेत .
डोळ्यासमोर हा माल पडत चालल्याने या उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी येत आहे .अथक प्रयत्न,भरघोस खर्च करूनही हातात काहीच येत नसल्याने हे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत त्यातच पुढील हंगामही धोक्यात आला आहे .
परदेशातून कॅलिफोर्निया, स्पेन, इटली या देशातून लागवडीसाठी येणारी टिशू कल्चर ची रोपे यावर्षी येतील की नाही याची चिंता आहे .त्यामुळे जर रोपे आली नाही तर पुढील वर्षीचा हंगाम होणार नाही. स्थानिक बाजारपेठा ठप्प झाल्याने सुमारे 40 ते 45 कोटींचा स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला हाच जास्तीत जास्त उत्पन्नाचा बंपर हंगाम असतो पण तोही लॉक डाऊनमुळे पडल्या ने शेतकरी पूर्णपणे आर्थिक गर्तेत सापडला आहे. दरवर्षी एकरी 10 ते 12 टन उत्पन्न घेताना सर्व उत्पादकांचा विचार करता या वर्षी सुमारे दोनशे कोटींचे नुकसान झाले आहे, असे स्ट्रॉबेरी उत्पादक गणपत पार टे व किसन भिलारे यांनी यावेळी सांगितले स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांनी पुढील हंगामासाठी प्रदेशातून रोपे मिळाली नाही तर पुढील हंगामात धोक्यात येणार आहे. व या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाल्याचे सांगितले आहे.