सातारा : सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह विविध जिल्ह्यातून चारचाकी वाहने चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून त्यांनी 13 डंपर, 1 ट्रक, 1 टँकर, 2 ट्रॅक्टर, तसेच ट्रॅक्टर ट्रॉली, विहिरीवरील क्रेन चोरल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुभाष गंगाराम सावंत, विजय पाटोळे, हणमंत भगवान पाटोळे, सागर शंकर चव्हाण (सर्व रा. दिवडी ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुभाष सावंत हा त्याच्या साथीदारासह सातारा तसेच इतर जिल्ह्यातही चारचाकी वाहने चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या टीमने त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले. सुभाषचा साथीदार विजय पाटोळेने वडूज शहरातून एक दुचाकी चोरली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर या टोळीचा छडा लागला. परजिल्ह्यातून वाहने चोरून आणल्यानंतर ही टोळी सर्व वाहने स्क्रॅप करत होती. तसेच कजहाडमधील अनिस रशीद चौधरी याच्यामार्फत कोल्हापूर येथील अन्वर दाऊद कच्छी व परवेझ सदाम पटेल यांना विकत होते. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
एक ट्रॅक्टर, ट्रॉली, पाण्याचा टँकर, एक डंपरचे स्पेअर पार्ट असा एकूण 15 लाख 50 हजारांचा ऐवज या टोळीकडून जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक रमेश गर्जे, प्रसन्न जजहाड, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, हवालदार उत्तम दबडे, मोहन घोरपडे, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, मुबीन मुलाणी, रामचंद्र गुरव, रवी वाघमारे, रुपेश कारंडे, मारूती लाटणे, नितीन गोगावले, संजय जाधव, विजय सावंत, संजय वाघ, मारूती अडागळे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, आटुगडेवाडी, कोकरुड, जि. सांगली येथील बाळू विठ्ठल शिंदे यांच्या घरामध्ये 30 ऑक्टोबर 2016 ला दरोडा पडला होता. यावेळी संशयित आरोपी प्रवीण ऊर्फ परव्या राजा शिंदे (रा. गोपूज ता, खटाव) याच्यासह त्याच्या साथीदारांनी सशस्त्र दरोडा टाकून त्यांना गंभीर जखमी केले होते. याशिवाय दहिवडी, उंब्रज, वडूज, पुसेगाव, वडगाव निंबळक, चिंचणी वांगी या परिसरातही अनेकांना लुटमार करून गंभीर जखमी केले होते. खटाव येथून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने 37 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.