कोरोना (कोविड१९) च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील गरजू कुटुंबाना जीवनावश्यक अन्नधान्याचे कीटसाठी रक्कम रु. १ कोटी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसही रक्कम रु. १ कोटीची मदत :-  मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा :-  कोविड १९ (करोना) मुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली आहे. या व्हायरसमुळे देशावरच नाहीतर संपूर्ण जगावर भीषण संकट उभे राहीले आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन असून संचारबंदी मुळे रोजगार बंद झालेने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झालेने अनेकजण बेरोजगार झाले आहेत तर रोजंदारी करणारे मजूर, स्थलांतरित कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबाना सदर संकटातून बाहेर पडणेसाठी मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री यांचेमार्फत सामाजिक भावनेतून लोकांची जबाबदारी घेणेबाबत आवाहन केले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही बँकींग कामकाजाबरोबर विकासाभिमुख व सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग घेऊन सर्वतोपरी मदत करणेचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील स्थलांतरित, तसेच मोलमजुरी काम करणारे मजूर व गरजू कुटुंबाना त्यांचे दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे कीट उपलब्ध करून देणेचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. याकरिता मा. जिल्हाधिकारी, सातारा यांच्या सूचनेप्रमाणे बँकेने संबंधित तहसिलदार यांचेकडून गरजू लाभार्थींची यादी प्राप्त करून घेतली आहे. या यादीनुसार संबंधिताना महसूल विभाग व बँकेच्या माध्यमातून अन्नधान्याचे किट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या किटमध्ये तेल, तांदूळ , साखर, तांदूळ, चटणी, हळद, गहू आटा इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश केला आहे. सर्वसाधारण १७५०० किटचे वितरण जिल्ह्यातील शेतमजूर, कामगार तसेच दारिद्र्य रेषेमध्ये नाव समाविष्ठ नसलेल्या व सरकारकडून कोणत्याही प्रकारचे रेशन न मिळालेल्या गरजू कुटुंबाना याचा लाभ होणार आहे. या जीवनावश्यक किटसाठी बँक रक्कम रु. १ कोटी खर्च करणार आहे.
मा .मुख्यमंत्री यांचे आवाहनास प्रतिसाद देत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी सातारा जिल्हा बँकेच्या मा. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत करणेचा निर्णय घेतला आहे. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक तसेच विविधरूपाने सर्वतोपरी मदत केलीली आहे. बँकेने २०१७ -१८ च्या नफ्यातून जलसंधारणासाठी रक्कम रु. १ कोटी तसेच सन २०१८-१९ चे नफ्यातून जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करणेकरिता रक्कम रु. २ कोटीची आर्थिक मदत केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्याच्या या कोरोना व्हायरसच्या भीषण संकटावर मात करणेसाठी बँकेने मा. संचालक मंडळ सदस्यांचा सभाभत्ता व बँक अधिकारी/सेवक यांचे १ दिवसाचे वेतन रक्कम रु .१६ लाखाची मदत मा .मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करणेत आली . या मदतीचा धनादेश .सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी जिल्हाधिकारी मा .श्री .शेखर सिंग यांचेकडे सुपूर्त केला आहे. तसेच बँकेने २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या नफ्यातून मा .मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रक्कम रु. १ कोटी देणेचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या सहमतीने घेतला आहे. प्रत्येक वर्षी आपल्या नफ्यातून एवढी मोठी रक्कम सामाजिक बांधिलकीतून समाजहितासाठी खर्च करणारी महाराष्ट्रातील एकमेव सहकारी बँक आहे.
यावेळी बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा .ना .श्रीमंत रामराजे ना .निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री मा .ना .श्री .बाळासाहेब पाटील, अध्यक्ष, मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष श्री .सुनिल माने, संचालक मा. आ. श्री. मकरंद पाटील, मा. श्री. प्रभाकर घार्गे, मा. श्री. शशिकांत शिंदे, मा. श्री. विक्रमसिंह पाटणकर यांनी संपूर्ण जगावरील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी मनोकामना व्यक्त केली .
सध्याच्या या कोरोना व्हायरसच्या भीषण संकटावर मात करणेसाठी सातारा जिल्हा परिषद यांचे मार्गदर्शनाखाली बँकेमार्फत ‘कोविड १९’ काळजी घ्या घाबरू नका’ ही मार्गदर्शनपर पुस्तिका गावोगावी ग्रामीण भागात पोहचविणेचे काम केलेले असून यामध्ये आजार होऊ नये, या आजारासाठी घ्यावयाची काळजी, मास्क, सॅनिटायझर वापर कसा करावा तसेच या आजारा संदर्भात सर्वसाधारण अफवा काय आहेत? याची उत्तम माहिती समाविष्ठ केलेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेत कोरोनाबाबत जनजागृती निर्माण होणेस व या आजारापासून स्वतःचा बचाव करणेसाठी माहिती पुस्तिकेचा उपयोग होणार आहे. या आजाराशी दोन हात करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेऊन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणेसाठी बँकेने शाखा व मुख्य कार्यालय पातळीवर जरुर त्या उपाययोजना केल्या आहेत . शाखा सेवकांना मास्क, सॅनिटायझर, कॅशिअर सेवकांना ग्लोव्हज तसेच ग्राहकांकरिता हात धुणेसाठी साबण, पाणी, सॅनिटायझर इ .ची सुविधा उपलब्ध केली आहे. शासनस्तरावरुन दिलेल्या सूचनांची बँक प्रभावी अंमलबजावणी करीत असून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे .
बँकेने ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांना बँकिंग सुविधा व सेवा त्वरित उपलब्ध व्हाव्यांत याकरिता ३२० शाखाचे जाळे कृषी-सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे .ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतीमान करणेसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. बँकेच्या ३२० शाखेमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईटची फवारणी केली आहे. बँकेने आपल्या ४७ एटीएम मध्ये आवश्यक ती स्वच्छता ठेऊन पुरेशी कॅश उपलब्ध करून दिली असून ग्राहकांना २४ तास सेवा दिली जात आहे. संचार बंदीच्या काळातही जिल्ह्यातील ग्राहकांना बँकेच्या ATM VAN च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बँकेने संकटकाळी आजपर्यंत विविध प्रकारे सर्वतोपरी मदत केलेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणेसाठी शाखा सेवकांनी व ग्राहकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी व हे संकट दूर करणेसाठी प्रयत्नशील राहावे. तसेच वेळोवेळी साबणाने व पाण्याने हात स्वच्छ धुणे, सनिटायझरचा वापर करणे, विनाकारण घरातून बाहेर न पडणेसाठी बँकेचे अध्यक्ष, मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आवाहन केलेले आहे.