Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीन्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ; सन 2000 पूर्वीच्या बॅचेसचे माजी...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ; सन 2000 पूर्वीच्या बॅचेसचे माजी विद्यार्थी उपस्थित राहणार : अमित कुलकर्णी

सातारा : सातारच्या शैक्षणिक क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस 118 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सन 2000 पूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध स्नेहमेळावा बुधवार, दि. 6 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहमेळाव्यास 2000 पूर्वीच्या बॅचेसच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी केले आहे.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कौन्सिल मेंबर सी.ए. सारंग कोल्हापुरे, अ‍ॅड. अश्‍विनी झाड, सौ. मंजिरी दीक्षित, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. एस. कांबळे उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने दिवाणाची पागा, फरासखाना येथे 19 व्या शतकात 6 डिसेंबर 1899 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पहिले सुपरिंटेंडेट कै. सीतारामपंत देवधर यांच्या कार्यकाळेत अवघ्या 37 विद्यार्थ्यांसह ही शाळा सुरू झाली. सुशिक्षित व सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीची मुहूर्तमेढ या निमित्ताने सातारा शहरात रोवली गेली. आज या शाळेचे विशाल ज्ञानगंगेत रूपांतर झाले असून या शाळेत प्रतिवर्षी 2265 विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेच्या असंख्य माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावताना शाळेचा व सातार्‍याचा नावलौकिक उंचावला आहे. दिवाणाची पागा ते सध्याची दगडी शाळा या प्रवासात शाळेने अनेक स्थित्यंतरे घडवली आहेत.
राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, सामाजिक अशा आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात या शाळेचे हजारो माजी विद्यार्थी उल्लेखनीय काम करत आहेत. 21 व्या शतकातही शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू आहे. सातारा शहरातील अनेक पिढ्या या शाळामाउलीने घडविल्या आहेत. ज्या शाळेत आपण शिकलो, बागडलो, खेळलो, आपल्या उज्ज्वल भवितव्याला आकार दिला गेला, त्या न्यू इंग्लिश स्कूलविषयी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेम वाटते, यात काहीच नवल नाही. या शाळेविषयी माजी विद्यार्थ्यांच्या भावना ओथंबून वाहतात. या शाळेत ज्ञानदानाचा यज्ञ अखंड सुरु ठेवणार्‍या गुरुवर्यांनी विद्यार्थ्यांना प्रेमाबरोबरच शिस्तीचे धडेही दिले आहेत. याच भावना व्यक्त करण्याची आणि शाळामाउलीच्या भेटीची ओढ पूर्णत्वास नेण्यासाठी बुधवार, दि. 6 रोजी शाळेच्या 118 व्या वर्धापनदिनानिमित्त सन 2000 पूर्वीच्या बॅचेसच्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंधफ हा स्नेहमेळावा सायंकाळी 5 ते 7 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. शाळा लवकरच शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. त्य अनुषंगाने कार्यक्रमाची तयारी करण्यात येत असून यापुढे दरवर्षी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार आहे.  शाळेची  वेबसाईट विकसित करण्यात येत आहे. स्नेहमेळाव्यासाठी सदर वेबसाईटवरही माजी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलनाचा या स्नेहमेळाव्याचा उद्देश नाही. या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमित कुलकर्णी यांनी केले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular