सातारा, दि. ( प्रतिनिधी ) :- छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे व सर्वप्रथम शिवरायांची जयंती साजरी करणारे समाजक्रांतिकारक जोतीराव फुले यांची कटगुण ही कुलभूमी आहे. त्यांच्या पत्नी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांची जन्मभूमी असलेलं नायगांव हेही याच जिल्ह्यात. सातारच्यादृष्टीने या दोन्ही गोष्टी अभिमानास्पद व गौरवपूर्ण अशाच आहेत. नायगांव येथे काही वर्षापूर्वी शिल्पसृष्टी साकारुन सावित्रीमाईंच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्याचे काम शासनाने केले. परतु, जोतीराव फुले यांच्या कटगुण या कुलभूमीत मात्र शिल्पसृष्टी अद्यापही साकारली नाही. वास्तविक या शिल्पसृष्टीचा मुद्दा जिल्हा प्रशासनापासून ते मंत्रालयापर्यंत वारंवार समोर आणला असताना ऐन अधिवेशन काळात यासंबधी सातारा जिल्ह्यातील एकही लोकप्रातिनिधी सभागृहात बोलत नाही, हा म. फुलें यांचा अवमान आहे. शासनही याबाबत भूमिका घेत नसल्याने महात्मा फुलेंचे यांना ॲलर्जी आहे काय ? असा प्रश्नांकित आरोप साहित्यिक अरुण जावळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. केला.
अरुण जावळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, ११ ते १२ वर्षापूर्वी कटगुणच्या शिल्पसृष्टीबाबत प्रशासन स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर जिल्हापरिषदेत ठरावही मंजूर झाला. मंत्रालयस्तरावरही हालचाली झाल्या. तथापि या शिल्पसृष्टीला मूर्तरुप आले नाही. खरंतर, ही बाब खेदजनक आहे. ज्या फुले दांम्पत्याचा वारसा हा सातारा जिल्हा मोठ्या अभिमानाने महाराष्ट्रभर सांगतो, त्या जिल्ह्यातील चक्क जोतीरावांच्या कुलभूमीत शिल्पसृष्टी होत नाही, हा एका अर्थाने जोतीरावांचा घोर अवमान आहे. शासनाकडे म. फुलेंची विचारदृष्टी नसल्यानेच हे घडत असून किमान यापुढेतरी शासनाने शिल्पसृष्टीकडे दुर्लक्ष करू नये. दोन कोटींची तरतूद करून शिल्पसृष्टी लवकर कशी साकारता येईल याबाबत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी गाभीर्याने विचार करावा. सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीनी यासाठी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने एका महात्म्याला अभिवादन करावे.
जोतीराव फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलगामी समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्यप्रवर्तक होत. कर्जबाजारपणापायी हैराण झालेल्या शेतकऱ्यांची गा-हाणे फुले यांनी वेशीवर टांगली. समाजातील अगदी शेवटच्या तळाच्या थरातील माणसांच्या दुःखाशी समरस होऊन सामाजिक न्यायाच्या आणि समतेच्या त्यांनी चळवळी केल्या. न्याय आणि समता यावर आधारलेली समाजरचना अस्तित्वात आणण्याचा ध्येयवाद फुले दांम्पत्याने अंगीकारला. इतकेच नव्हेतर त्यासाठी ते अखेरपर्यंत झटले. १८४८ ला मुलींची पहिली शाळा सुरू करून जोतीरावांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. स्त्री ही एक समाजाचा स्वतंत्र घटक आहे असून तीला प्रतिष्ठा आहे. मानवी नैसर्गिक हक्क – अधिकार तिला मिळाले पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला. १८६९ ला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवरायांचे कार्यकर्तृत्व त्यांनी जगापुढे आणले. याशिवाय सतीची चाल, बालविवाह, केशवपन अशा अनिष्ट रुढी – परंपरा विरोधात प्रखर बंड छेडले. या एकूण लढ्यात स्वतः सावित्रीमाई फुले सावलीसारख्या जोतीरावांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या, त्यामुळे तर फुले दांम्पत्याचे ‘क्रांतिकारकत्व’ समग्र समाज परिवर्तनाच्या चळवळीला विशिष्ट आयाम देणारे ठरले. सामाजिक उत्थानाच्या कार्यामुळे फुले दांम्पत्याचा आदर केवळ महाराष्ट्रच करत नाही, तर देशभर केला जातो.
पाच सहा वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने जोतीराव फुले यांना भारतरत्न बहुमान मिळावा यासाठी केंद्र सरकारजवळ आग्रह धरला होता. सरकारचा हा आग्रह स्वागतार्ह असला तरी फुले यांना अद्याप भारतरत्न दिला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक भारतरत्न मिळण्याबरोबरच कूलभूमीत जोतीरावांची शिल्पसृष्टी साकारावी यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यायला हवी. यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे यांनाही हा विषय माहित आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पत्रव्यवहार झालाय, मात्र त्यांच्याकडून अद्यापही सकारात्मक हालचाल होत नाही. खरतंर, जिल्हाप्रशासनाने शिल्पसृष्टीचा प्रस्ताव तयार करुन मंत्रालयाकडे एव्हाना पाठवायला हवा होता. मात्र प्रशासनही कानाडोळा करत आहे. लोकप्रतिनिधीच्या इच्छाशक्तीचा – विचारदृष्टीचा अभाव आणि शिल्पसृष्टीबाबत कमालीची उदासिनता यामुळे प्रशाससही हालत नाही. किमान या अधिवेशनात तरी शिल्पसृष्टीबाबत ठोस निर्णय व्हावा अन्यथा जिल्ह्यातील फुलेवादी विचारप्रवर्तकांडून सत्याग्रहाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा साहित्यिक अरुण जावळे यांनी दिला आहे.