सातारा: एकामागून एक प्रभावीपणे सादर होत असलेल्या युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या कविता, अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन, साथीला रेखाटली जात असलेली कवितांची चित्रे आणि उपस्थितांची मिळत असलेली उत्स्फूर्त दाद, यामुळे मर्ढे गावातली रविवारची संध्याकाळ अतिशय काव्यमय होवून गेली. निमित्त होते सातारच्या मोहोर ग्रुपतर्फे आयोजित मर्ढेकरांची कविता या कार्यक्रमाचे. प्रस्तावित मर्ढेकर स्मारकांत प्रथमच झालेल्या या कार्यक्रमास मर्ढेकरांच्या कुटुंबियांनीही हजेरी लावल्यामुळे या कार्यक्रमास एक वेगळेच मूल्य लाभले.
मर्ढेकरांच्या साहित्याचे अभ्यासक आणि सातारचे कवी श्रीनिवास वारुंजीकर यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाची संहिताही त्यांनीच लिहिली होती. चित्रा भिसे यांनी सादर केलेल्या माझा अभंग, माझी ओवी या अभंगसदृश रचनेपासून प्रारंभ झालेला हा कार्यक्रम, मर्ढेकरांनी लिहिलेले नव्या युगाचे पसायदान म्हणजेच भंगु दे काठिण्य माझे पर्यंत उत्तरोत्तर रंगत गेला. त्यामध्ये मधुसूदन पतकी यांनी सादर केलेल्या मी एक मुंगी आणि पिंपात मेले ओल्या उंदीर या कवितांना, डॉ. राजश्री देशपांडे यांच्या दंवात आलीस भल्या पहाटी, अजुन येतो वास फुलांना, दीपक कुलकर्णींच्या गणपतवाणी, मानसी लाटकर यांच्या जातेस तरी सुखाने, तसेच हर्षल रजेशिर्के यांच्या बन बांबूचे पिवळ्या गाते, झोपली गं खुळी बाळे आणि डॉ. वर्षा बोकील यांच्या कितीतरी दिवसांत आणि आला आषाढ श्रावण या कवितांना विशेष दाद मिळाली. तसेच तन्वीर एसी या बालकलाकाराच्या (ईरेस पडलो), अजित करडे (शिशिरर्तुच्या पुनरागमे), अतुल शहा (पोपटपंची), श्रीकांत केटी (पोरसवदा होतीस) आणि अभय देवरे (अस्थाईवर स्थायिक झालो) या कविताही उल्लेखनीय ठरल्या. वारुंजीकर यांनी फलाटदादा आणि ह्या गंगेमधी गगन वितळले अशा कविता सादर केल्या. तसेच मर्ढे गावातील सात बालकलाकारांनी सादर केलेल्या किती पायी लागू तुझ्या या कवितेने विशेष दाद मिळवली.
प्रारंभी मर्ढे गावच्या सरपंच जयश्री शिंगटे यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले. तसेच मर्ढे गावातील मर्ढेकरप्रेमी अजित जाधव यांचा मोहोर ग्रुपच्या वतीने अॅड. सिमांतीनी नूलकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. मर्ढेकरांच्या कुटुंबातील सदस्य रश्मी तुळजापूरकर यांनी आपल्या भावपूर्ण मनोगतात म्हटले की, मोहोर ग्रुपच्या सर्वच सदस्यांना मर्ढेकरांनी झपाटून टाकले असून या प्रत्येकाच्या शरीरात जणू काही मर्ढेकरांच्या आत्म्यानेच प्रवेशकेला आहे, असे वाटते आहे. कार्यक्रमास मर्ढेकर स्मारकाचे वास्तुविशारद उदयन श्रीनिवास कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे, विजय लाटकर, प्रशांत कुलकर्णी यांचेही सहकार्य लाभले. सागर गायकवाड यांनी आभार मानले.
मर्ढेकर स्मारकात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगली भावरम्य कवितांची संध्याकाळ
RELATED ARTICLES