म्हसवड – पानवन ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ . ज्योत्स्ना शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी सौ. राणी दत्तात्रय शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. तर स्वप्नील नरळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी बाबा नबाजी शिंदे यांची निवड झाली.
गतकालीन सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सत्ताधारी गटांतर्गत झालेल्या कराराप्रमाणे अडीच वर्षानंतर राजीनामे दिले होते. त्यानंतर प्रशासनाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी मंडल अधिकारी ए. एम. अहिवळे, गाव कामगार तलाठि संतोष ढोले, सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत या निवडी पार पडल्या. सदर निवडीसाठी एक एक अर्ज आल्याने सरपंचपदी सौ. राणी दत्तात्रय शिंदे यांची , तर
उपसरपंचपदी बाबा नबाजी शिंदे यांची निवड झाली.
दरम्यान या निवडणुकीसाठी संभाजी शिंदे, डॉ. नानासाहेब शिंदे, दत्तात्रय शिंदे, धनाजी शिंदे, पोपट शिंदे, जी. पी. शिंदे, जगन्नाथ चव्हाण हे सर्व गटांचे नेते एकत्र आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच या सर्व नेते मंडळींच्या एकत्र येण्याने गावाच्या विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
या निवडीबद्दल नव नियुक्त सरपंच, उपसरपंच यांचे आ. जयकुमार गोरे, माण तालुका कॉँग्रेस अध्यक्ष संजय जगताप, राजाराम तोरणे, पोपट शिंदे, शरद नरळे, शहाजी गोरवे, नाथा तूपे, नानासाहेब शिंदे, सर्जेराव शिंदे यांनी अभिनंदन केले.