Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडी‘डोल्यापुरते फकीर’ भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर का उभा?

‘डोल्यापुरते फकीर’ भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर का उभा?

सातारा (प्रशांत पवार) : आषाढी एकादशीपूर्वी पुण्यातून जेव्हा पालख्या बाहेर पडतात. तेव्हा वारकर्‍यांच्या अवती – भवती जी गर्दी जमलेली असते. तेही उभा टिळा लावतात. माऊली माऊली बोलतात. ते वारकरी असतातच असे नाही. एकादशी संपली की आकाडीचा वेध लागलेले (खूपजण) असतात. तसेच पूर्वी आपल्याकडे मुहर्रम किंवा मोहरमचा सण मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. त्यावेळी जी ताबुताची मिरवणूक निघते. तिच्या अवती – भवती फकीर बनून काही लोक नाचत असतात. त्या ताबुताला डोला असेही म्हटले जाते. असा डोला निघाला की तेवढ्यापुरते फकीर खूप असतात. महाराष्ट्रात निवडणुकीची मिरवणूक निघाली की त्यात बरेच डोल्यापुरते फकीर सामील होत असतात. आजच सकाळी सोशल मिडियावर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची एक मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात, मी खरा शिवसैनिक आहे. ते बघून – ऐकूनच डोल्यापुरते फकीर या म्हणीची आठवण झाली.
असे डोल्यापुरते फकीर सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात लुडबूड करताना दिसतात. काही वैचारिक भूमिका नाही. कशाचा पाचपोच नाही. शेंडापण नाही आणि बुडका पण. त्यांचे गुणवर्णन नंतर कधीतरी करता येईल. पण सध्या विषय आहे तो राष्ट्रवादीतून भाजपात आलेला गृहस्थ शिवसेनेच्या चिन्हावर का उभा आहे तो.
त्याला राष्ट्रीय संदर्भ आहे. चौकीदार आणि सबचौकीदार यांच्यासाठी लोकसभेची एक एक जागा महत्त्वाची आहे. गेल्यावेळी भाजपने संपूर्ण देशात 31 टक्के मते मिळवून 282 जागा जिंकल्या होत्या. साध्या बहुमतापेक्षा 10 जागा जास्त. तर भाजपच्या मित्रपक्षांना 54 जागा मिळाल्या होत्या. हा एकत्रित आकडा होता 336 चा. यातल्या बहुतांश जागा त्यांना उत्तर व पश्चिम भारतातून मिळाल्या होत्या. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश, उत्तराखंड व राजस्थान या राज्यात लोकसभेच्या 249 जागा येतात. त्यापैकी भाजप व मित्रपक्षांनी 236 जागा जिंकल्या होत्या. उर्वरित 100 भाजप व मित्रपक्षांनी संपूर्ण देशात जिंकल्या होत्या.
आता मुद्दा आहे तो बहुमताचा. वर्षभरापूर्वी उत्तरप्रदेशात पोटनिवडणुका झाल्या. त्यात भाजपचा पराभव झाला. हिंदी पट्ट्यातील तीन राज्यात भाजपचा पराभव झाला. उत्तरप्रदेशात मोठी घसरण आहे तर गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडात गेल्यावेळी एवढ्या जागा मिळतील अशी स्थिती नाही. 236 पैकी 100 जागा हातातून निसटतील. त्यामुळे आधीपासूनच भाजपने दग्दभू धोरण स्वीकारले आहे. बिहारमध्ये भाजपने गेल्या निवडणुकीत 22 जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षा जास्त लढविल्या होत्या. लढवलेल्या जागांचा आकडा होता तीस. या निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या पाच जागा मित्रपक्षांना सोडल्या आणि न जिंकलेल्या आठ जागा सोडून दिल्या. कारण काहीही करायचे आणि कसेही करायचे. केंद्रातील सत्ता पुन्हा एकदा मिळवायचीच. म्हणून तर महाराष्ट्रातली पालघरची जिंकलेली जागा भाजपने शिवसेनेला दिली. वरकडी म्हणजे आपला खासदार शिवसेनेच्या चिन्हावर उभा केला. सातारा मतदारसंघाबाबत पण भाजपच्या राज्यातील कारभार्‍यांंना तसेच फिडींग करण्यात आले.
जावलीत रयत – सरंजामी जमिनीचा प्रश्न आहे. त्यामुळे तिथली जनता राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात आहे. वाई मतदारसंघात तीन सहकारी साखर कारखाने आहेत. त्या कारखान्याचे नेतृत्त्व ज्या मदन भोसले यांच्याकडे आहे ते भाजपमध्ये आलेत. कोरेगावात नरेंद्र मोदीजी यांचे गुरु वकीलसाब लक्ष्मणराव इनामदार यांचे थेट वैचारिक वारसदार आणि बावणकशी नेतृत्त्व महेश शिंदे यांनी मोठे रान तोडलेय. कराड उत्तरमध्ये जरा अडचण आहे. पण पाटण आणि कराड दक्षिण या विधानसभेच्या मतदारसंघात अगोदरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरुद्ध वातावरण आहे. बाकी शिवसेना भाजपच्या विजय शिवतारे, यांनी पालकमंत्रीपदाच्या प्रचंड मोठ्या यशस्वी कारकीर्दीने, नितीन बानगुडे दशसहेस्त्रु वक्तव्याने आणि चंद्रकांत (दादा शब्द जोडून वाचावा) पाटील यांच्या वरकड महसुलाने असे काही वातावरण तयार झालेय की विचारता सोय नाही. त्यासाठी फक्त आणि फक्त वानवा होती ती तगडा उमेदवार सापडण्याची. त्यासाठी भाजपमध्ये आलेल्या मदन भोसले यांच्या नावाची चाचपणी झाली. पण ते अगोदरच काँग्रेसमधून भाजपमध्ये जिवावर दगड ठेवून आले. आठ दिवसात पुन्हा पक्षांतर. अगोदर दुप्पटा आणि नंतर दोरा बांधण्यास त्यांनी नकार दिला. तोपर्यंत नरेंद्र पाटील सारखे ढुशा मारत होते. त्यांना चंद्रकांत पाटील यांनी अलगद शिवसेनेत नेऊन सोडले. उमेदवार केेले. झेंडा शिवसेनेचा असला तरी दांडा भाजपचाच आहे हे आता लपून राहिलेले नाही.
मुळातच ही जागा भाजपला हवी होती. पण ती युतीत 1991 पासून शिवसेनेच्या वाटणीला येते. गेल्यावेळी शिवशक्ती – भीमशक्ती एकत्र होती. त्यामुळे शिवसेनेने ही जागा रिपाईला दिली होती. लोकसभेनंतर महायुती मोडली. रिपाई भाजपबरोबर गेली. त्यामुळे यावेळीही ही जागा पुन्हा रिपाईला द्यायचा प्रश्न नव्हता. शिवसेना आणि भाजपमध्ये जे काही जागावाटप झाले त्या जागावाटपात एक एक आकडा महत्त्वाचा होता. जरी भाजपने पाटण विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात आपली ताकद पणाला लावली असली तरी आणि हा मतदारसंघ भाजपला हवा असला तरी राज्यातल्या जागांचे फेरफार त्यांना करता आले नसते. म्हणून भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर उभा आहे. फार पूर्वी मुंबईत काही शिवसैनिक जनसंघाच्या पणती आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या नांगर चिन्हावर लढले होते. काळाचा महिमा असा की यावेळी भाजपच्या माणसाला शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे.
उमेदवार भाजपचा चिन्ह शिवसेनेचे म्हणून शिवसेना या मतदारसंघात गुंतलीय असेही काही नाही. शिवसेनेने आकडा महत्त्वाचा मानला आणि भाजपने डोके. अगोदरच ही जागा राष्ट्रवादीची, त्यात उदयनराजे उमेदवार. म्हणजे भाजपसाठी खायचे झाले तर चटणीत जादाची मिरेपूड. किल्ला असा की देवगिरीसारखा. किल्ल्यातून कुणी फितूर व्हावे तर त्याची पत नाही. रसद आतून बाहेर पुरवावी तर तेवढी क्षमता नाही. शिवसेनेसाठी हा मतदारसंघ 1996 साली झेंडा फडकवावा असा होता खरा. पण ती स्थिती आता राहिलेली नाही. म्हणूनच भाजपने आपल्या स्वत:च्या हितासाठी या मतदारसंघात जोर लावलाय. हळूहळू लोकांच्याही लक्षात येत चाललेय की धनुष्याच्या दोरीला कमळाचा बाण लागलाय. बाणाची पुढची बाजू टोकदार असावी लागते. पसरटपणाचा इथे काय पाड लागणार?
भाजप किंवा संघाच्या पठडीत देशाचा प्रमुख, राज्याचा प्रमुख, विभागवार प्रमुख म्हणजे देवगिरीचा (मराठवाडा) विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे विभाग आहेत. देशाचा प्रमुख नरेंद्र, राज्याचा प्रमुख देवेंद्र आहे. पश्चिम महाराष्ट्राचे कोतवाल आहेत चंद्रकांत पाटील. त्यांना झाडून सार्‍या पश्चिम महाराष्ट्राच्या परंपरेवर संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा लेप चढवायचाय. ते इरेला पेटलेत. सातार्‍याच्या लढाईची सुत्रे त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडील लाभार्थी काही उघडपणे, काही छुपेपणे उभे आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular