सातारा : सातारा नगरपालिकेच्या मुळ प्रारूप तसेच पुरवणी मतदार यादीमधील गंभीर चुकांची दुरूस्ती करावी. या मागणीचे निवेदन आज भारतीय जनता पार्टी सातारा शहर शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी आश्विन मुद्गल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेने प्रसिध्द केलेल्या मुळ प्रारूप व पुरवणी मतदार याद्यामध्ये अनेक गंभीर चूका आहेत.
यामध्ये मतदार यादीतील पत्त्यानंतर कधीही रहात नसलेल्या मतदारांची बोगस नोंद झालेली आहे. मयत मतदारांची नावे वगळलेली नाहीत. अनेक मतदारांची नावे दुबार नोंदविलेली आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागामध्ये नोंदविली गेली आहेत. दुबार मतदारापैकी काही मतदारांचे व्होटर्स आयडी क्रमांक वेगवेगळे आहेत तसेच काहीचे पत्तेही वेगवेगळे नोंदविले गेले आहेत.
काही मतदारांचे नाव, वय तसेच लिंग योग्य पध्दतीने नोंदविलेले नाही. तसेच फोटो देखील चुकीच्या पध्दतीने नोंदविलेले आहेत, कित्येक मतदारांचे व्होटर्स आयडी क्रमांक नोंदविलेले नाहीत. अशा गंभीर चुकामुळे अनेक मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित रहाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व चुका स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक केल्या असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष सुनिल काळेकर, जिल्हा सरचिटणीस विजयकुमार काटवटे, शहर सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, विकास गोसावी, आप्पा कोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.