Friday, March 28, 2025
Homeठळक घडामोडीजिल्हा परिषद , पंचायत समितीसाठी उदयनराजेंच्या स्वतंत्र चाचपणीने राष्ट्रवादीत खळबळ ; सातारा...

जिल्हा परिषद , पंचायत समितीसाठी उदयनराजेंच्या स्वतंत्र चाचपणीने राष्ट्रवादीत खळबळ ; सातारा तालुक्यात आमदार गटाच्या कोंडीची रणनिती; 13 तारखेपासून स्वतंत्र दौरा

सातारा :  सर्वसामान्य घरातील महिला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बहुमताने बसवल्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचा वारु सुसाट आहे. या यशाचा फायदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीत इनकॅश करण्यासाठी उदयनराजेंनी आमदार गटाची कोंडी करण्याची रणनिती आखली असून येत्या 13 डिसेंबरपासून 10 गटांचा स्वतंत्र दौरा आयोजित करण्यात आला आहे. राजेंच्या या दौर्‍यामुळे राष्ट्रवादीचे नेते संभ्रमीत झाले असून सातारा तालुक्यातील पुढची समीकरणे काय असणार या चर्चेने सगळेच धास्तावले आहेत.

सर्वसामान्य घरातील व्यक्ती आमदार झाल्याशिवाय कोणताच गुलाल अंगावर घेणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करणार्‍या उदयनराजेंनी आता जनता म्हणेल तो आमदार हे सत्यात उतरवण्यासाठी ताकदपणाला लावायला सुरुवात केली आहे. उदयनराजेंच्या या पवित्र्यावर राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड शांतता आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये 14 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी 10 नगरपालिका खिशात घालूनही राष्ट्रवादीला वाई, कराड, म्हसवड, कोरेगाव येथे आपली पत राखता आली नाही. आणि सातारा तालुक्यात तर मनोमिलनात विस्फोट झाल्याने खासदार गट व आमदार गट आमने-सामने ठाकणार असून राजकीय इर्षेची टस्सल पुन्हा एकदा दिसून येणार आहे. जिल्हा परिषदेच्या 10 गटात खासदार गटाची ताकद ही अधिक असल्याने त्याचा फायदा घेण्याची पुरेपूर तयारी उदयनराजे यांनी केली असून दि. 13 ते 22 या 9 दिवसात सर्व गटातील व गणातील इच्छुकांच्या गाठीभेटी व मुलाखती उदयनराजे स्वत: घेणार आहेत. या नियोजनाची बैठक शुक्रवारी पोवई नाका येथील जुन्या सभापती निवासमध्ये पार पडली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवी साळुंखे, संदीप शिंदे, पंचायत समिती सदस्य सूर्यकांत पडवळ, जि. प. सदस्य वनिता पोतेकर, संजय पोतेकर, सुनिल काटकर, अ‍ॅड. सतीश माने, तसेच मार्केट कमिटी व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अनेक सदस्यांनी आक्रमक भाषणे केली. उदयनराजे यांनी सुध्दा स्वबळाचाच निर्धार केला असून त्या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात आले आहे. एकंदर जिल्हा परिषद निवडणुकांचा माहोल बघितला तर राष्ट्रवादीपेक्षा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही उदयनराजेंना सध्या राजकीय समीकरणे अनुकूल आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला बरोबर घेऊन राजेंनी राष्ट्रवादीला बरोबर धोबी पछाड दिला. तसेच उदयनराजे गटाच्या 5 सदस्यांना राष्ट्रवादीने अपात्रता नोटीस बजावल्याने राजे समर्थक प्रचंड दुखावलेले आहेत. आमदार गटाला बरोबर घेऊन खासदारांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न सातारा तालुक्याच्या राजकारणात यापूर्वी झालेला आहे ही बाबही उदयनराजे विसरलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंचा आगामी दौरा हा राजकीय वर्तुळात महत्वपूर्ण मानला जात आहे. जावलीत सातारा व कोरेगाव या तीन तालुक्यात राष्ट्रवादीमधील नाराजांना आपल्या गळाला लावण्याच्या प्रयत्नात भाजपा असून मिनी मंत्रालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्याची सुरुवात प्रत्यक्ष वर्णे गटातून होऊ शकते अशी चिन्हे आहेत. या सगळ्या हालचाली उदयनराजेंच्याच पथ्यावर पडणार असून राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. उदयनराजे हे जरी राष्ट्रवादीचे खासदार असले तरी राष्ट्रवादीकडून मिळालेल्या वागणुकीचा उट्ट्या काढण्यासाठी सातारा तालुक्यात आपली ताकद दाखवणे आणि आपले उपद्रव मूल्य सिध्द करणे हाच या दौर्‍याचा अजेंडा असल्याचे बोलले जात आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular