कराड: भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना कराड दक्षिण मतदारसंघातून सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान मिळवून देणार असल्याची घोषणा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी केली. भाजपा-शिवसेना-रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ विंग (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर डॉ. प्राची पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, म्हाडाफचे संचालक मोहनराव जाधव, पैलवान आनंदराव मोहिते, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन काशीद, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक श्रीरंग देसाई, कृष्णा बँकेचे संचालक हेमंत पाटील, बाळासाहेब जगताप, शेतीमित्र अशोकराव थोरात, डॉ. विशाखा भोसले, कविता कचरे, अनिता जाधव, पंकज पाटील, डॉ. सारिका गावडे, संजय पवार, नामदेव कळंत्रे, सुहास कदम आदी मान्यवर उपस्थित होेते.
ना. डॉ. अतुल भोसले म्हणाले, की भारतीय सेनेच्या जवानांनी शौर्य दाखवत बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात शेकडो दहशतवादी ठार केले. पण जवानांच्या या कामगिरीबद्दल शंका उपस्थित करत काँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हल्ल्याचे पुरावे मागत आहेत. हा देशाशी प्रतारणा करणारा विचार असून, माजी मुख्यमंत्र्यांना यात केवळ राजकारण दिसले.
या असल्या वृत्तीमुळे जिल्हाध्यक्षही त्यांच्या काँग्रेस पक्षात राहू शकले नाहीत आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष निवडण्याची वेळ त्यांच्यावर येत असेल, तर सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय न्याय देणार? असा सवाल उपस्थित करत, नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी नरेंद्र पाटील यांना विजयी करा, असे आवाहन केले.
डॉ. प्राची पाटील म्हणाल्या, कर्हाड आणि पाटण सोडले तर जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांत दुष्काळाची स्थिती भयावह आहे. विद्यमान खासदार दहा वर्षे सत्तेत आहेत. मात्र त्यांनी राजवाड्याचा दरवाजा उघडून कधी त्याकडे बघितलेही नाही. त्यामुळेच आज जिल्ह्याचा विकास खुंटला असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचा धनुष्यबाण नरेंद्र पाटील यांनी उचचला असून, विजय आपलाच आहे, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात, मोहनराव जाधव, अनिता जाधव, विशाखा भोसले यांचीही भाषणे झाली. श्रीरंग देसाई यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच संजय खबाले यांनी आभार मानले.
कराड दक्षिणेतून नरेंद्र पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार : ना.डॉ.अतुल भोसले
RELATED ARTICLES