घरफोडी करणारे चार जण एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार

सातारा: सातारा शहर व मेढा, पाचगणी परिसरात घरफोड्या करणारी टोळी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तथा हद्द प्राधिकरण तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवला होता. अविनाश चंद्रकांत गोळे, किरण चंद्रकांत बेलोशे, किशोर शामराव गोळे, गणेश चंद्रकांत बेलोशे (सर्व रा. रुईघर, ता.महाबळेश्‍वर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयितांच्यावर सातारा शहर, मेढा, पाचगणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती, तसेच त्यांच्याकडून समाजातील
शांतता धोक्यात आल्याच्या अनेक तक्रारी पोलीस दलाकडे आल्याने सातारा शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख तथा हद्द प्राधिकरण तेजस्वी सातपुते यांच्याकडे संशयितांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर सातपुते यांनी संशयितांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले.