शाहुकला मंदिरमध्ये प्रयोग अन् गोंधळाची तालीम पालिकेत
एकाच दिवशी दोन कार्यक्रमांच्या बुकींगचा खजिना विभागाचा कारनामा
सातारा : सातारा पालिकेच्या कारभाराचे सूरस किस्से अरेबियन नाईटस्ला लाजवतील इतके भन्नाट आहेत. मनोमिलनाच्या पर्वाला साडेचार वर्षे पूर्ण होत आली तरी सुध्दा सातारा पालिकेचे कर्मचारी कामाच्या बाबतीत कर्तव्य दक्षता पाळेनासे झाले आहेत. शाहुकला मंदिराच्या व्यवस्थापकाला न विचारताच खजिना विभागाच्या कर्मचार्याने परस्पर पावती केल्याने 13 ऑगस्ट रोजी शाहुकला मंदिरमध्ये एकाच वेळी दोन कार्यक्रमांचे बुकींग झाले. या सावळ्या गोंधळाचा ट्रेलर गेल्या दोन दिवसापासून पालिकेत सुरु असून परस्पर पावती करणारा ‘तो’ कर्मचारी कोण? यावर पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र अगदीच अब्रु जायला नको म्हणून मुख्याधिकार्यांकरवी खडे बोल सुनावून या प्रकरणावर पडदा टाकण्याची तजवीज लेखा विभागाकडून केली जात आहे.
सातारा शहरात रंगकर्मींसाठी एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे शाहुकला मंदिर. नाट्य प्रयोग असो अथवा कोणताही जाहीर कार्यक्रम घेण्यासाठी डीसीसीच्या सभागृहाचा अपवाद वगळता शाहुकला मंदिर हे माफक दरात उपलब्ध होणारे रंगमंच आहे. या मंदिराची व्यवस्था पालिकेचे कर्मचारी प्रशांत खटावकर यांच्याकडे आहे. त्यांच्या परवानगीशिवाय आणि तारखांची खातरजमा झाल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमांची नोंदणी केली जात नाही. मात्र लक्ष्य फौंडेशन व सातार्यातील एका नामांकित डांन्स, इन्स्टिट्युटच्या कार्यक्रमाचे ठिकाण, वेळ व दिवस एकाच दिवशी आल्याने म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी आल्याने पालिकेत सावळा गोंधळ सुरु झाला. लक्ष्य फौंडेशनने शहिद जवानांच्या स्मृती जागवण्यासाठी तीन तासाचा चांगला कार्यक्रम ठेवला असून त्याची नोंदणी एप्रिल महिन्यातच केली होती. तर डांन्स अॅकॅडमीने 12 जुलै रोजी त्यांच्याच स्पर्धां डान्स मास्टर राघव जुऐल याच्यासाठी 13 ऑगस्टचीच नोंदणी केली होती. प्रत्यक्ष मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांच्यासमोर दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी बुकींगच्या निमित्ताने एकत्र आल्याचा सावळा-गोंधळ पुढे आल्याने प्रशासनाची एकच धावपळ झाली. डान्स अॅकॅडमीचे आयोजनकर्त्येही यानिमित्ताने अवाक् झाले. हा चमत्कार कोणी घडवला याची शोधाशोध सुरु झाली. दोन्ही आयोजनकर्त्यांनी आरोग्य सभापती रवींद्र झुटींग यांचे केबिन गाठून आपली व्यथा मांडली. तर डांन्स अॅकॅडमीचे कर्ते-सवर्ते यांनी थेट जलमंदिर गाठले. साराच मामला खासदार उदयनराजे भोसले यांच्या दरबारात गेल्याने महाराजांनी नेहमीच्या शैलीत फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह असा निकाल दिला. त्यामुळे लक्ष्य फौंडेशनचा कार्यक्रम निश्चित झाला. असे असताना खजिना विभागात डोके रिकामे ठेवून परस्पर बुकींग घेणारा हा कर्मचारी कोण याचा खुलासा मात्र शेवटपर्यंत झाला नाही. लेखा परिक्षक हेमंत जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नजरचुकीने हा प्रकार घडल्याचे सांगत नेहमीच्या स्टाईलने वेळ मारुन नेली. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनाही हा प्रकार नवीनच होता. अर्थात गोरेंना सातारा पालिकेच्या तर्हा आणि व्यथा समजण्यासाठी अजून वेळ आहे अशी खाजगीत चर्चा करणारे महाभाग पालिकेत त्या दिवशी रेंगाळत होते.
शाहुकला मंदिरमध्ये प्रयोग अन् गोंधळाची तालीम पालिकेत
RELATED ARTICLES