सातारा :कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चवणेश्वर येथील श्री चवणेश्वराची यात्रा शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 ऑक्टोबर रोजी असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सौ. नीता संतोष पवार यांनी दिली.
कोरेगाव व वाई तालुक्याच्या सीमेवर समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर चवणेश्वर हे ऐतिहासिक ठिकाण आहे. देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांचे मित्र सप्तर्षीपैकी एक भृगपुत्र चवणऋषी यांची ही तपोभूमी. चवणऋषींची तपोभूमी म्हणून या गावाचे वेगळेच महत्व असल्यामुळे राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक याठिकाणी येत असतात. चवणेश्वर येथे श्री चवणेश्वर, महादेव व जानुबाई देवीची मंदिरे असून या मंदिरांचा जिर्णोध्दार काही वर्षांपूर्वी उद्योगपती मधुकर मुसळे यांच्यासह भक्तांनी केला आहे. त्यामुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. दिवसेंदिवस चवणेश्वर येथे भक्तांची गर्दी वाढू लागली आहे.
दरवर्षी अश्विन महिन्यातील चौथा शनिवार व रविवारी श्री चवणेश्वराची यात्रा भरते. शनिवारी श्री चवणेश्वरांचा गावातून छबिना निघतो. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी गावातील मानाची लोटांगणे होतात. दुपारी श्री चवणेश्वराची सासनकाठी व गुळुंबच्या सासनकाठीची भेट होते. यावेळी वाण्याचीवाडी, वरखडवाडी, करंजखोप, रणदुल्लाबाद, मोरबेंद, सोनके, हिवरे, तरडगाव आदी ठिकाणांहून सासनकाठ्या येत असतात. सासनकाठ्यांचा भेट सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. चवणेश्वर गावास सन 2000 पासून पर्यटनस्थळ क वर्ग दर्जा मिळाला असल्याने गावाचा कायापालट होत आहे. चवणेश्वरच्या सरपंच सौ. नीता संतोष पवार यांनी गावच्या अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन वर्षात चवणेश्वर येथे विविध विकासकामे मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे. यात्रेसाठी येणार्या भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. करंजखोप ते चवणेश्वर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सौ. नीता पवार यांनी पाठपुरावा केल्यानंतर बांधकाम विभागाने दुरुस्ती केली आहे. मंदिरासमोरील विहिरीला ग्रामपंचायतीच्यावतीने जाळीचे कंपाउंड करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्घटनेस आळा बसणार आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्यावतीने मंदिरात सौर उर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात आला आहे. मंदिर परिसरात सौर दिवे बसवण्यात आल्याने मंदिर परिसरात झगमगाट झाला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने वीज, पाणी, रस्त्यासह मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे.
श्री चवणेश्वराची शनिवारपासून यात्रा
RELATED ARTICLES