सातारा: ब्रिटीशांच्या जुलूमी राजवटी विरोधात सशस्त्र क्रांती करुन आपल्या देशप्रेमाची चुणूक दाखविणारे महावीर, महानायक वीर लहुजी वस्ताद यांनी समाजाला लढण्याची ताकद दिली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्विकारली. या युगपुरुषांच्या वैचारिक बैठकीला स्मरुण वीर लहुजी वस्ताद यांच्या सोमवार दि. 14 नोव्हेंबर रोजी सातार्यात बहुजन इशारा मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय सर्वपक्षीय सर्वसमाज घटकांच्या सातारा येथील बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजघटक म्हणून अशोकराव गायकवाड उपस्थित होते. तर मार्गदर्शक म्हणून प्रा. सुकुमार कांबळे, वर्षा देेशपांडे, मधुकर आठवले, अमोल आवळे, आप्पा तुपे, शरद गायकवाड, स्वाती बल्लाळ, स्मृती गोवानी, फारुख पटनी, सनी शिंदे, अशोक मारुडा, प्रदीप माने, संदिप शिंदे, रविंद्र सोनवले, युसूफ बागवान, गोपाळ घाडगे, राजु जगताप, गौतम वाघमारे, सचिन वायदंडे, शुक्राचार्य भिसे, सचिन कांबळे, उद्धव कर्पे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व बहुजन, मुस्लिम, बारा बलुतेदार व ब्राह्मण, कुणबी मराठा व अल्पसंख्यांक घटकातील सुमारे दोन हजार कार्यकर्ते उपस्थित होते.
बहुजन समाजाच्या प्रश्नावर समाज जागृती झालेली आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर यावे लागलेले आहे. या समाजाच्या जिवावर 159 मराठा घराण्यांनी सर्व जातींवर राज्य केले. पण कोणत्याही जातीचे भले केलेले नाही. मराठा समाजाचा आक्रोश म्हणजे हजारो वर्षे अन्याय होत असलेल्या बहुजन समाजाच्या आक्रोशाचे प्रतिक आहे. लाखोंच्या संख्येने प्रत्येक जाती-धर्मातील लोक संघटित होवू पाहत आहेत. या सर्वांची मोट बांधून बहुजन समाजाची ताकद निर्माण करताना कोणत्याही मागासवर्गीय, माळी, सुतार, परिट, नाभिक, कोल्हाटी, धनगर, वडार, रामोशी, घिसाडी, लोहार, इतर मागासवर्गीय, भटक्या व विमुक्त जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्वसामान्य गरीब व कष्टकरी, शेतमजुर, शेतकरी, आर्थिक दुर्बल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्याचबरोबर जातीपातीचा विचार न करता प्रत्येक जातीतील महिला व युवतींचा सन्मान राखला पाहिजे. खैरलांजी, कोपर्डी, तडवळे येथील नराधमांना लवकरात लवकर फाशी देवून त्या अभागी माता-भगिनींना न्याय दिला पाहिजे. राज्यघटनेनुसार दुर्बल घटकाचे संरक्षण व्हावे, यासाठी 1989 साली मंडल आयोग व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा जन्मास घातला. पण त्याची कधीच काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली दिसून आलेली नाही. उलट या कायद्याचा वापर दुर्बल घटकांपेक्षा सबल घटकांनीच जास्त प्रमाणात केला आहे. या कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे. त्याचबरोबर या कायद्याचा दुरुपयोग करणार नाही, असे शपथपत्र सादर करण्याची सक्ती राज्यशासनाने करावी, अशीही मागणी पुढे आलेली आहे.
या बहुजन इशारा मोर्चामध्ये कोणत्याही जातीधर्माच्या विरोधात हा प्रतिमोर्चा नसून हा समविचारी मोर्चा आहे. कोणताही राजकीय बॅनर न वापरता शांततेच्या मार्गाने हा मूकमोर्चा असून या सर्व मोर्चाचे नियोजन माता-भगिनीच करणार आहेत. या मोर्चामध्ये तडवळे येथील अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळण्यासाठी तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीचाही फलक लावण्यात येणार आहे. सातारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून या मोर्चाची सुरुवात करताना वीर लहुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाची सांगता होणार आहे. शांततेच्या मार्गाने निघणार्या या मोर्चामध्ये सर्व जातीधर्मातील सातारकर वासीयांनी उपस्थित रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
(छायाःप्रकाश वायदंडे)