श्रीनिनाई – लक्ष्मी- भैरीच्या नावान चांगभलं.. ; पाटणची श्रीलक्ष्मी देवी यात्रा ; देशासह महाराष्ट्र कोरोना मुक्त होण्याचे देवीला घरूनच भाविकांचे होणार साकडे

पाटण ची श्रीलक्ष्मी देवी माता पार्वती चे एक रूप आहे. ही देवी दुर्जनांचा नाश करणारी व जगाचे पालन करणारी आहे. देवीच्या मूळ पाषाणाचे अवलोकन केले तर ती राक्षसाला पायदळी घेऊन विजयी मुद्रेने त्यावर उभी असलेली सिंहावर आरूढ झालेली हाती शस्त्र धारण केलेले दिसते. म्हणून या केरा कोयना काटा च्या मुलखावर तिची कृपादृष्टी आहे. या आई पांढरीच्या कृपेने पाऊस पाणी होतो. शेती पिकतात आणि मनुष्य जीवन फुलते अशी आपली श्रद्धा आहे. म्हणून वर्षातले दोन दिवस भाविक नवरात्र व जत्रेच्या निमित्ताने सहपरिवार देवीच्या दर्शनाला येतात. देवीच्या उंबरठ्यावर माथा ठेवून तिची प्रार्थना करतात. पोराबाळांना सुखी ठेव अशी याचना करतात. आणि नैवेद्य नारळ देऊन समाधानी होउन परत जातात.

मात्र आज जगासह राष्ट्रावर कोरोना विषाणूचा पसरलेला महाभयंकर आजार यामुळे महाराष्ट्रासह भारतातील देव-देवतांची सर्वच मंदिरे सणवार यात्रा बंद करण्याच्या आलेल्या प्रसंगामुळे पाटण ची पांढरी श्रीनिनाई, श्रीलक्ष्मी देवी ची आज गुरुवार व उद्या शुक्रवारी भरणारी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी देवीच्या भाविक भक्तांनी घरातूनच देवीला नैवेद्य दाखवून तिचे स्मरण करावे व कोरोनाचे आलेले संकट दूर करून मुलाबाळांसह सर्वांना सुखी ठेवावे अशी याचना करावी.*

यात्रेनिमित्त स्मरण होण्यास श्रीनिनाई श्रीलक्ष्मी देवीचे महात्म्य

श्रीलक्ष्मी देवी पाटण ची ग्रामदेवता मात्र अग्रपूजेचा मान तिची बहीण श्रीनिनाई देवीला जातो. म्हणून घोषणेत देखील श्रीनिनाई देवी चा उल्लेख आधी येतो. या देवीचे मंदिर लक्ष्मी देवी टेकडीच्या पायथ्याशी आहे. श्रीलक्ष्मी देवीला एक भाऊ आहे. त्याचे नाव भैरी म्हणजे भैरवनाथ अर्थात कामतलिंग भैरवनाथ पूर्वी हा देव पाटणच्या मुख्य पेठेत वास करीत असे. त्यावेळी तेथे वस्ती नव्हती झाडेझुडपे माजली होती. त्या ठिकाणी लोक कचरा टाकत त्यामुळे देव दुखावला आणि रागाने थेट सुंदरगडाच्या पायथ्याशी टोळेवाडी वर जाऊन बसला अशी आख्यायिका आहे. आता पाटण मधील त्याच्या मुळ ठिकाणी त्याचे ठाणे म्हणून छोटेसे मंदीर उभारले आहे. या ठिकाणी भाविक गुलाल भंडारा वाहून दर्शन घेऊन पुन्हा पश्चिमेला टोळेवाडी कडे पाहून श्रीभैरीला नमस्कार करतात. श्रीलक्ष्मी देवी मंदिर परिसरात देखील श्रीभैरीचा निवास कल्पिला आहे. या भैरीचे दर्शन घेतल्यावर आपण प्रत्यक्ष लक्ष्मी देवीच्या मंदिरात दाखल होतो.
श्रीलक्ष्मी देवीची यात्रा ही पाटण तालुक्यातील शेवटची यात्रा असते. यानंतर पाऊस काळ सुरू होतो. शेतकऱ्यांना मशागतीची ओढ लागते पाऊस चांगला होऊन शेती समृद्ध व्हावी अशी मनोमन प्रार्थना येथील भूमिपुत्र हात जोडून देवीला करतो. श्रीलक्ष्मी देवी यात्रेला टोळेवाडी होऊन बहिणीच्या भेटीला श्रीभैरवनाथाची ची पालखी येते परंपरेनुसार टोळेवाडी करांना निमंत्रणाचा नारळ दिला जातो. भैरवनाथाची पालखी श्रीलक्ष्मी देवीच्या भेटीला आल्यानंतर दोन्ही देवांच्या पालख्यांची पाटण गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक म्हणजे गावातून दोन्ही देवांचा छबिना असतो. या छबिनाचा थाट वेगळाच असतो. यापुढे वादकांचा ताफा अश्व शोभा वाढवतात. पुढे श्री लक्ष्मी देवीची पालखी पाठोपाठ भैरवनाथाची पालखी या दोन्ही पालख्या बरोबर गुलालाचा मळवट भरलेले बारा बलुतेदारांच्या मानकऱ्यांसह भाविक ग्रामस्थ व ट्रस्टी मोठ्या संख्येने सहभागी असतात. छबिन्या च्या वाटेवर घरोघरी सुवासिनी पंचारती ओवाळून पालख्यांचे स्वागत करतात व सर्वजण मनोभावे देवाचे दर्शन घेतात. या छबिना मिरवणुकीत दोन्ही पालख्या गुलालाने रंगून मध्यरात्री श्रीलक्ष्मी देवी मंदिराकडे परत येतात. येथे फुलोराचे वाटप होऊन आरती होते. गोंधळ होतो. दिवटी नाचते. देवीच्या अनेक नावाच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय होते. दुसऱ्या दिवशी दिवसभर मंदिर परिसर भाविक भक्तांनी भरून गेलेला असतो. पाटणच्या बाजार मैदानात यात्रेनिमित्त तमाशाचा फड रंगतो. तर दुपारी हलगीच्या तालावर जंगी कुस्त्यांचे मैदान भरते. या मैदानं तर सायंकाळी श्रीनिनाई- लक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलं चा जयघोष होऊन यात्रेची सांगता होते.
*अशीही पाटण ची यात्रा गतवर्षापासून कोरोनाच्या संकटात सापडली असताना भाविक भक्तांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव श्रीलक्ष्मीदेवी श्रीनिनाई देवी मंदिर परिसर बंद ठेवण्यात आला आहे. तर यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी घेतला आहे. यात्रा काळाच्या या दोन दिवसात भाविक भक्तांनी घरूनच देवीला नैवेद्य दाखवून दर्शन घेऊन स्मरण करून देशासह महाराष्ट्रावर आलेले कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. कोणीही मंदिराकडे येण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.*

लेखन- श्री शंकर मोहिते,
पत्रकार पाटण.