मायणी :- मयणी येथील सालाबादप्रमाणे होणाऱ्या श्री सिध्दनाथ देवस्थान रिंगावण यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे .आजच्या यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजेच रथ सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. सकाळी रथाची मा सुरेंद्र गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित,सर्व मानकऱ्याच्या हस्ते रथाची विधिवत पूजा करण्यात आली .
यावेळी ट्रस्टचे चेअरमन व प्रमुख मानकरी विकास देशमुख ,सचिव सुधाकर कुबेर,सर्व देवस्थान ट्रस्ट चे मानकरी,मंडल अधिकारी चंद्रकांत बारवे ,वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के ,सपोनि संतोष गोसावी, तलाठी प्रवीण घोरपडे,चाटे आदींची उपस्थिती होती .यावेळी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सर्व मान्यवरांचा मनाचा फेटा,शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .
सर्वगुणसंपन्न ,सर्व शक्तीयुक्त व संकटाच्या काळी धाऊन येणारी शक्ती म्हणजे परमेश्वर.परमेश्वराच्या मूर्तीकडे पाहिले तर ती काहीच देत नसते काही घेत नसते.पण,परमेश्वराकडे श्रध्येने व भक्तीने पाहिले तर परमेश्वर खूप काही देत असतो. चांगली बुद्धी ,चांगले विचार,चांगले कार्य आपणाकडून घडवत असतो.असा परमेश्वर जळी, स्थळी,काष्ठी,पाषाणी सर्वत्र असतो. परंतु मनुष्य अहंकारापोटी,खोट्या प्रतिष्ठेपोटी परमेश्वराला कधी धर्माच्या तर कधी जातीच्या ,तर कधी भाऊकीच्या नावाखाली सीमित करीत असतो.
त्यावर अधिकार सांगत असतो पण परमेश्वरावर विशिष्ठ कोण जातीचा,भाऊकीच्या अधिकार नसतो तर सर्वात मोठा अधिकार भक्ताचा असतो असे उद्गार सुरेंद्र गुदगे यांनी सिध्दनाथ रथावरून काढले. ते पुढे बोलताना म्हणाले,परमेश्वर सुद्धा आवडत्या भक्ताची निवड करीत असतो.त्यासाठी कर्तव्यपरायण माणूस हा जीवन साधक असतो म्हणजे जो आपली कर्तव्य पार पाडतो तो खरा भक्त असतो. जो दीनदुबळ्या सामान्य माणसाला मदत करतो,त्याच्याशी चालली कृती ,व्यवहार करतो,समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडतो,तो खरा परमेश्वराचा आवडता भक्त असतो.
ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे , “कर्म करावा हा चांगु निरुप माझा” चांगले कर्म केले तर परमेश्वर त्यास सामर्थ्य देतो.अशी व्यक्ती समाजाला सामर्थ्य देते. त्यामुळे चांगले कर्म करत राहा , असेही ते म्हणाले. यानंतर ढोल ताशा,बेंजो यांचा दणदणाटात व ‘सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं’ असा गजर करीत मोठ्या भक्तीभावाने भाविकांनी रथ ओढण्यास सुरुवात केली,व रथ सोहळ्याच्या ग्राम प्रदीक्षणेसाठी सुरुवात झाली . रथ गुदगे वाड्या जवळ आल्यानंतर मायणीचे नूतन सरपंच सचिनभाऊ गुदगे ,श्रीमती जयश्री गुदगे (काकू) व गुदगे कुटुंबियांनी दर्शन घेतले. त्यानंतर रथ चावडी परिसरात येथे आल्यानंतर माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी पालखी व रथाचे दर्शन घेतले .यावेळी खटाव चे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी रथ सोहळ्यास भेट देऊन सिद्धनाथाचे दर्शन घेतले. या नंतर रथ उभीपेठ,नवीपेठ,मुख्य बाजारपेठ,बस स्टँड परिसर,फुलेंनगर,येथून चांदणी चौक येथे आला.चांदणी चौक येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती . त्यानंतर रथ वडूज रोड येथे जाऊन पुन्हा चांदणी चौक मार्गे गावातील सिध्दनाथ मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाला. भाविक भक्तांनी मोठया श्रध्येने रथावरती रोख स्वरूपात रुपये अर्पण केले .
गेल्या काही दिवसातील रिंगावण यात्रेच्या पार्श्वभूमीवरील तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोडवलेल्या भाविकांच्या संख्येने दिसून आला . परंतु प्रशासन व पोलीस यांच्या मध्यस्थीने वेळीच तोडगा काढण्यात आल्याने रथ उत्सव शांततेत पार पडला.
पो नि यशवंत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष गोसावी ,पीएसआय कोळेकर, पीएसआय मदने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने गावात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही आणि गावातील वाहतूक बायपास ने वळवण्यात आल्याने रथ मार्गात कोठेही अडथळा आला नाही .
सायंकाळी सुरेंद्र गुदगे यांच्या गटाच्या सिध्दनाथ यात्रा कमिटीयांचेकडून जि प प्राथमिक शाळेच्या मैदानात तर डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या सिध्दनाथ यात्रा कमिटीतर्फे खंडोबा माळ या दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी या दोन्ही गटाच्या कमिटींच्या मार्फत लोकांसाठी मनोरंजन करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.