अबुधाबी- तेलाचा एकही थेंब न सांडवता जगप्रदक्षिणा यशस्वी करण्याचा जागतिक विक्रम सोलर इम्पल्स-2फ या विमानाने केला. या विमानाच्या यशामुळे मानवाला विमाने चालवण्यासाठी तेलाऐवजी सौरऊर्जेचा मोठा पर्याय मिळाला आहे. येत्या काही वर्षात सौरऊर्जेवर चालणारी विमाने आकाशात भरारी मारताना दिसल्यास नवल नाही.
या प्रकल्पाचे संचालक व वैमानिक बेट्रांड पिकॉर्ड यांनी अखेरच्या टप्प्यात कैरोहून 48 तासांचा प्रवास करून सोलर इम्पल्स-2 हे अबुधाबीच्या विमानतळावर मंगळवारी सकाळी 4.05 (भारतीय प्रमाणवेळेनुसार 5.35 वा.) उतरवले. येथील अल-बतीन विमानतळावर या विमानाच्या स्वागतासाठी शेकडो जण जमले होते. हे विमान उतरताच टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.
गेल्या वर्षी 9 मार्च रोजी या विमानाने आपल्या जगप्रदक्षिणेला अबुधाबी येथून सुरुवात केली होती. वैमानिक बेट्रांड पिकॉर्ड आणि सहवैमानिक अॅँड्रे बोर्शबर्ग यांनी हे प्रचंड आव्हान लीलया पेलले. या विमानाने जवळपास 16 महिन्यांत 42 हजार किलोमीटरचा प्रवास करून चार खंड पालथे घातले. या प्रवासात त्यांनी दोन महासागर, तीन समुद्र पार केले. विशेष म्हणजे बोर्शबर्ग यांनी जपान ते हवाई हे 8924 किलोमीटरचे अंतर 118 तासांत या विमानाने कापले. हे प्रचंड अंतर न थांबता पार करण्याचा जागतिक विक्रम बोर्गबर्ग यांच्या नावावर जमा झाला.
विक्रमानंतर भावना व्यक्त करताना प्रकल्पाचे संचालक व वैमानिक बेट्रांड पिकॉर्ड म्हणाले की, भविष्य स्वच्छ ऊर्जेचे असून ही मोहीम पुढे नेणे गरजेचे आहे. सोलर इम्पल्स-2 विमानाने ऊर्जेच्या इतिहासात मोठी क्रांती केली आहे. आपल्याकडे पुरेसे तंत्रज्ञान असून त्यासाठी लागणारे मनुष्यबळही आहे. अन्य मार्गाने जाण्याच्या भीतीपोटी जगाला प्रदूषित करणे अयोग्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 2003 रोजी या प्रकल्पाला सुरुवात झाली होती.
सौर विमानाच्या जगप्रदक्षिणेचा जागतिक विक्रम

RELATED ARTICLES