Monday, April 28, 2025
Homeठळक घडामोडीपाटण मार्केट यार्डात बुधवारी जंगी कुस्त्यांचे मैदान ; महाराष्ट्र केसरी बाला...

पाटण मार्केट यार्डात बुधवारी जंगी कुस्त्यांचे मैदान ; महाराष्ट्र केसरी बाला रफीक ठरणार कुस्तीचे आकर्षण

पाटण:- महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर (दादा) यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पाटण येथील मार्केट यार्डमध्ये बुधवार दि. 2 जानेवारी रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात नुकताच महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविणारा पुण्याचा बाला रफीक तसेच इतर नामवंत मल्लांचा सहभाग असणार आहे. तसेच यावेळी पै. हर्षदा चव्हाण (सुपने विरूध्द पै. समृध्दी पाटील (चाफळ), पै. जयंती पाटील (कोल्हापूर) विरूध्द पै. वैशाली साळुंखे (किवळ) या महिलांच्या प्रेक्षणीय कुस्त्याही आयोजित केल्या असल्याची माहिती पाटण तालुका अमृतमहोत्सव कुस्ती नियोजन समितीच्यावतीने देण्यात आली.

यावेळी हिंदकेसरी पै. संतोष वेताळ (आबा), डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, काले गावचे पै. नानासाहेब पाटील, छत्रपती पुरस्कार विजेते मुंबईचे पै. आनंदा शिंदे, आटके गावचे पै. धनाजी पाटील (काका), कराड तालुका कुस्ती संघटक पै. तानाजी चवरे, कुस्ती कोच एनआयएस साताराचे प्रा. दिलीप पवार, उपमहाराष्ट्र केसरी नारायणवाडीचे पै. जयकर खुडे, महाराष्ट्र चॅम्पियन सुपनेचे पै. प्रशांत पाटील, धामणीचे पै. रखमाजी नेर्लेकर, कुस्ती कोच कुंडलचे पै. सुनिल मोहिते, म्हासोलीचे पै. शहाजी साळुंखे, कुस्ती कोच कराडचे प्रा. अमोल साठे, वारणाचे पै. संदीप पाटील, विरवडेचे पै. सतीश डांगे, बनपुरीचे पै. अविनाश पाटील, क्राईम ब्रॅंच मुंबईचे पै. चंद्रकांत पुजारी, सहाय्यक फौजदार साताराचे पै. शत्रुघ्न कोळी, सांगवडचे पै. बाळासाहेब कुंभार, मुंबई पोलीस अशोक डिगे, कालेचे पै. दत्ता पाटील, कराडचे पै. सुदाम पावणे, सुपनेचे पै. शिवाजी पाटील, पै. दाजी माळी, पै. जगन्नाथ गायकवाड, उंब्रजचे पै. जगन्नाथ गायकवाड, प्रा. प्रल्हाद जाधव, राजन काळे, अतुल पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी कुस्ती मैदानात नुकताच महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविणारा पुण्याचा बाला रफीक विरूध्द कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांच्यात 2 लाखांची कुस्ती होणार आहे. तर द्वितीय क्रमांकासाठी जालनाचा विलास डोईफोडे विरूध्द गारगोटीचा समीर देसाई यांच्यात 1 लाख 50 हजार, तृतीय क्रमांकासाठी कोल्हापूरचा सिकंदर शेख विरूध्द विक्रम पारखे यांच्यात 1 लाख, चतुर्थ क्रमांकासाठी पुण्याचा संतोष पडळकर विरूध्द कोल्हापूरचा नवनाथ इंगळे यांच्यात 75 हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी कुंडलचा संभाजी कळसे विरूध्द कोल्हापूरचा विश्वास कारंडे यांच्यात 51 हजार रुपये, सहाव्या क्रमांकासाठी कराडचा अक्षय मोहिते विरूध्द कुंडलचा अक्षय कदम यांच्यात 51 हजार रुपये अशा पध्दतीने नामवंत मल्लांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या पहायला मिळणार आहेत.

तसेच अमर पाटील (कुंडल) विरूध्द योगेश दोडके (पुणे), नामदेव केसरे (वारणा) विरूध्द तुषार निकम (कुंडल), सुरज पाटील (कुंडल) विरूध्द शैलेश म्हस्के (मुंबई), शुभम कोळी (कुंडल) विरूध्द वैभव डोंब (सैदापूर), ओमकार मदने (कुंडल) विरूध्द समीर शेख (पुणे), रामा माने (वारणा) विरूध्द रोहन भोसले (कुंडल) यांच्यासह कुठरे, म्हावशी, येरफळे, म्हासोली, सुरूल, सुपने, अडुळ, कुंडल, वारणा, कराड, इस्लामपूर, काले, वाघेरी, रेठरे, पारगाव, मुंबई, पुणे, सैदापूर, बोंद्री, चाफळ, सोनवडे, साखरी, येराडवाडी, त्रिपुडी, बेलवडे, नाडोली, सुळेवाडी, कडेगाव, वाटेगाव, ओंड येथील मल्लांच्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत.

कुस्ती मैदानात निवेदक म्हणून पै. ईश्वरा पाटील (वारणा), पै. सुरेश जाधव (चिंचोली), पै. मधुकर घाडगे (म्हावशी), हलगीवादक सचिन आवळे (गारगोटी), तुतारीवादक मिलींद गुरव (पाटण) हे काम पाहणार आहेत. हे कुस्त्यांचे मैदान बुधवार दि. 2 रोजी दुपारी 2 वाजता सुरू होईल. तसेच एक नंबरची कुस्ती सायंकाळी 7 वाजता लावली जाणार आहे. या कुस्त्यांचा पाटण व पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटण तालुका अमृत महोत्सव कुस्ती नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

 

नुकतेच जालना येथे झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पुणे येथील बाला रफीक याने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविला आहे. त्याची कुस्ती कोल्हापूर येथील माऊली जमदाडे याच्याविरूध्द होणार असून ही कुस्ती या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण असणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular