जेव्हा येसूबाईंच्या पोषाखात भूमिका साकारली, तेव्हा प्रचंड अशी ऊर्जा मिळाली : प्राजक्ता गायकवाड

सातारा : स्वराज्यरक्षक संभाजीच्या सेटवर मी जेव्हा येसूबाईंच्या पोषाखात भूमिका साकारली, तेव्हा प्रचंड अशी ऊर्जा मिळाली. स्वत:ला सिद्ध करण्याची माझ्यात निर्माण झालेली ऊर्जा येसूबाईंचं चरित्र अभ्यासल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण होईल,फ असा विश्वास महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी व्यक्त केले. महाराणी येसूबाई राजधानी सातारा आगमन त्रिशताब्दी सोहळा समितीच्या वतीने येथील शाहू कला मंदिरमध्ये प्राजक्ता गायकवाड यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर आणि कवी प्रदीप कांबळे या दोघांनी गायकवाड यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राजक्ता गायकवाड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या सोहळ्याला ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुण्याचे श्रीमंत महेंद्र पेशवे, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन शेटे, नगरसेवक धनंजय जांभळे, समीर देवी, डॉ. रवींद्र भारती-झुटिंग, योगेश सूर्यवंशी, शीतल कदम, प्रिती जगताप, राजू गोरे, सुहास पोरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. भूमिका साकारण्यापूर्वी येसूबाईंच्या चरित्राचा अभ्यास कसा केला? या प्रश्नावर बोलताना प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, डॉ. अमोल कोल्हे आणि मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांच्याकडून बरंच काही शिकत आहे. अमोल कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार ऐतिहासिक भूमिका जेव्हा आपण करतो, तेव्हा त्या भूमिकेचे आपण ब्रँड अ‍ॅम्बेसिडर होतो, त्यामुळे जीव ओतून ही भूमिका करण्यावर मी भर दिला.येसूबाईंची भूमिका साकारताना आई-वडिलांचा पाठिंबा कसा मिळाला? या प्रदीप कांबळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर प्राजक्ता म्हणाल्या, दहावीत 92 टक्के मिळविल्यामुळे मी सर्वप्रथम माझ्या आई-बाबांचा विश्वास मिळवू शकले. या दोघांचा पाठिंबा पुढे सर्वच पातळीवर मिळत गेला.फ दरम्यान, महाराणी येसूबाई राजधानी आगमन सोहळा 4 जुलै रोजी आयोजित केला आहे, या सोहळ्यात सर्व उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केले. जयंत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अमर बेंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जीवावर बेतणारा तो प्रसंग
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत सहभागापूर्वी केवळ 15 दिवस आधी मी घोडेस्वारी शिकले. या मालिकेत येसूबाईंची म्हणजे माझा प्रवेश घोड्यावरून होता. किंग नावाच्या घोड्यावर मी बसले होते. मात्र, ऐनवेळी हा घोडा उधळला. मालिकेची संपूर्ण टीम घोड्याला थांबविण्यात गुंतली. फार कष्टाने घोड्याला थांबवता आलं. जीवावर बेतणारा हा प्रसंग होता.
प्रदीप कांबळे यांनी विचारलेल्या रॅपिड प्रश्नांना प्राजक्ता गायकवाड यांनी समर्पक उत्तरे दिली. भावी आयुष्यात लाँग ड्राईव्ह चार चाकीत नव्हे तर घोड्यावरून करायला आवडेल. आवडता अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, आवडते ठिकाण पुणे, आवडता पदार्थ चितळेंची तिखट भाकरवडी खाल्ल्यानंतर सातारी कंदी पेढा खायला आवडतो, अशी उत्तरे प्राजक्ता यांनी दिली.