बेरोजगारीची पायात बेडी; जमेना लग्नजोडी

 

 

तरुणाईच्या रोजगाराला लागले कोरोनाचा ग्रहण; शिकूनही नोकरी नाही त्यामुळे बायकोही नाही

 

अल्पेश लोटेकर

परळी

 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा मानला जाणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी झाली की चाहूल लागते ती गुलाबी थंडीची आणि जवळ येतात ती तुळशीचे लग्न. दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्नाचे बार उडतात, सनई-चौघडे यांचा आवाज दणदनू लागतात. पण हल्ली बेरोजगार युवकांचे दोनाचे चार हात होतच नाहीत. गेल्या काही वर्षात मुलांचा जन्म दर घटल्याने मुलींपेक्षा मुलांची संख्या वाढली आहे. त्यातच अनेक मुली संगणक, शिलाईकाम, ब्युटी पार्लर असे कोर्स करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. तर काही मुली डॉक्टर, इंजिनिअर, वकील बनवून नोकरी करतात. त्यांनाही नोकरीवाला किंवा व्यवसायवाला नवरा हवा असतो मात्र कोरोनामुळे सुशिक्षित तरुणही शिकून-सवरून बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी लग्न करण्यासाठी कोणीही तयार नाही. ही परिस्थिती बघता अख्खी पिढी नवऱ्या मुलीची शोध घेताहेत. मुलांचे लग्न ठरेना म्हणून त्यांचे आई-वडीलही डोक्याला हात लावून बसले आहेत. त्यामुळे बेरोजगारीची पायातील बेडी कधी तुटणार अन लग्नाची जोडी कधी जमणार अशा प्रश्नाच्या चक्रातच तरुण अडकलेले दिसत आहेत.

सातारा जिल्ह्यातील बहुतांशी तरुणवर्ग हा मुंबई पुणे येथे रोजगारासाठी स्थलांतरित होतात. मुंबई-पुण्यात काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बनतात. परंतु कोरोणाच्या आगमनाने सर्वच बाजारपेठा बंद होत्या मालक वर्ग व्यवसायिक यांचे मोठे नुकसान झाले. आणि मोठ्या प्रमाणावर तरुणांच्या हातातून मिळणारा रोजगार निसटला आणि त्यांना धरावी लागली ती गावची वाट. गेल्या आठ महिन्यांपासून गावात खितपत पडलेली ऐन वीस ते तीस वयोगटातील तरुण हाताला काम नाही करायचं काय आणि लग्नाचा तर वय चाललाय निघून याच चिंतेत एक दिवस पुढे ढकलत आहेत. नोकऱ्या नाहीत व्यवसायाला हवे ते भांडवली नाही उच्चशिक्षण घेऊन ही तरुणांच्या हाताला काम नाही असे बेरोजगार युवकांचे तांडेच्या तांडे गाव गल्ली फिरताना दिसत आहे. लग्नाचं वय उलटून गेलं तरी हात काय पिवळे होत नाही यामुळे तरुणाईत नैराश्य पसरल्याचे चित्र दिसत आहे.

*मुलींच्या अपेक्षांचा वाढतोय डोंगर*

मुलगा कसा असावा ही प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळे असते परंतु प्रत्येक मुलीला मुलगा सरकारी नोकरी वाला सर्विस वाला पाहिजे पगार पाणी व्यवस्थित पाहिजे याच अपेक्षांचा डोंगर हा दिवसेंदिवस वाढत चालल्याने बेरोजगारीच्या अडकलेल्या बेडीतील तरुणांची गळचेपी होत आहे तसेच शेतकरी नवरा आणि छोटे व्यवसाय तरुणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.