सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रिद चोवीस तास कर्तव्यतत्परता कामाचा प्रचंड ताण असूनही समाजरक्षणासाठी सतत अवहेलना झेलूनही खाकीला जे कर्तव्य करावे लागते त्याला तोड नाही. मात्र महाराष्ट्रात खाकीची गरिमा इतकी पराकोटीची तळाला गेली आहे की कोणीही यावे आणि खाकीच्या अबु्रला हात घालावा. या घटनाच चिड आणणार्या आहेत. आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगणार्या महाराष्ट्रात समाजरक्षणासाठी उभी राहणारी कायदेशीर यंत्रणाच नतद्रष्टांच्या हल्ल्याला बळी पडत असेल तर यासारखे दुर्देव ते काय. पोलीसांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे कायद्याचे रक्षकच आता असुरक्षित झाल्याने ती भावना महाराष्ट्रातल्या तमाम पोलीस कर्मचार्यांमध्ये दाटून आली आहे. विशेषतः रस्त्यावर वाहतूकीचे चौकाचौकात नियंत्रण करणारा पोलीस उद्दामाच्या दांडगाईला बळी पडतो आहे. मुख्यमंत्र्याच्या जबाबदारीत कार्यमग्न असणार्या देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री या नात्याने या घटनांची उत्तरे द्यावीच लागतील. मेक इन महाराष्ट्र अरे हा कसला महाराष्ट्र जिथे कायदाच सुरक्षित नाही, जेथे कायद्याचे रक्षकच सुरक्षित नाहीत तिथे अकरा कोटी जनता कोणाच्या भरवशावर जगणार? हा विश्वास राजकीय इच्छाशक्तीने आपल्या कामातून कमवायचा आहे मात्र मेक इन इंडियाच्या अनेक घोषणांमधून वेळ नसणार्या फडणवीसांना गृहमंत्रीपद हे पार्ट टाईम चालविण्याची वेळ आली आहे. मात्र राजकारणाच्या या पाटयामध्ये पिसला जाणारा महाराष्ट्र पोलीस हा सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात असणार्या जवानाइतकाच कर्तव्य तत्परतेचे भान असणारा आहे. मग त्याची अस्मिता त्याच्या कॉलरला हात घालून मातीत घालायची? खाकीवरचा हा कायद्याच्या संरक्षणावरील हल्ला देशाच्या अस्मितेवरील हल्ला. ज्या लोकशाहीने आपल्याला व्यक्तीस्वातंत्र्य दिले त्याचा अर्थ समजावून न घेता सवंग उथळपणाने कायद्याशी हुज्जत घालणे, अरेरावी करणे प्रसंगी मारहाण करणे हे दळभद्री समाज व्यवस्थेचे लक्षण आहे. आणि अशा घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभतात का?
कल्याण पुर्व येथे जरीमरी तलावात वाद्य वाजवण्याला पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांनी आक्षेप घेतल्याने त्यांचा तेथील मंडळाशी वाद झाला पण नंतर जे घडले ते कल्पनेच्या पलीकडचे होते. मंडळाच्या काही कार्यकर्त्यानी तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी निश्चितच शोभणार्या नाहीत. वाहतूकीचा नियम तोडल्याने हटकल्याबद्दल दोन माथेफिरू तरूणांनी केलेल्या हल्ल्यात विलास शिंदे या पोलीस कर्मचार्यांचा मृत्यू झाला अवघ्या महाराष्ट्रभरातून या घटनेचा निषेध झाला मात्र अशाच घटना गेल्या आठवडाभरात सातत्याने घडू लागल्याने पोलीस प्रशासनापुढे पर्यायाने गृहखात्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले. ठाण्यातील कार चालकाकडून पोलीस कर्मचार्याला निर्दयपणे फरफडत नेणे, बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये गुंड प्रवृत्तीना अटकाव करणार्या सहायक पोलीस निरीक्षकाला जबरी मारहाण होणे, धुळे येथे किरकोळ कारणावरून पोलीस उपनिरीक्षकाला दांडक्याने मारहाण होणे, संगमनेर मध्ये वाळू तस्कराचा खाकीवर झालेला हल्ला, जालनातील बदनापूूर येथे आमदाराच्या धमकीमुळे पोलीस निरीक्षकाने आत्महत्ेचा प्रयत्न करणे या सार्याच घटना सुन्न् करणार्या आहेत. विलेपार्ले, पुणे येथे पुरूष मंडळीच नाही तर वैचारिक भान सुटलेल्या स्त्रीयांनीही कायद्याच्या अब्रुला हात घालण्याचे कारनामे केले. यातून राज्याच्या सद्यस्थितीवर झगझगीत प्रकाश पडतो. जे चाललेल ते यंत्रणेलाच नाही तर समाज व्यवस्थेतील धुरिणांना विचार करायला लावणारे आहे. आणि हे असेच चालायचे अशी बाष्कळ मानसिकता ठेवण्याची निरर्थक बडबड करणे सोडून द्यावे लागणार आहे. महाराष्ट्रात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणे हा अनेकांना आपला जन्मसिध्द अधिकारच वाटतो. पुण्याच्या फराजखाना पोलीस चौकी परिसरात जर सहज चक्कर मारली तर वाहतूक नियमांचे घातले जाणारे लोणचे कसे असतील हे सहज दिसून येते. आवश्यक कागदपत्रे नसणे, सिग्नलचे पालन, सीटबेल्ट न लावणे, हेल्मेटचा वापर टाळणे या गोष्टी फारशा गांभीर्र्याने घ्यायच्या नसतात मात्र ही मानसिकता पुढे कायद्याशी होणार्या वादाला कारणीभूत ठरते यातून पोलीस कर्मचार्याशी वाद झाल्यास उगाच वाईट वाटायला नको. नियमानुसार दंड भरण्याऐवजी अमुकतमूक गाव पुढार्याला किंवा पोलीसामधल्या ओळखीच्या अधिकार्याला फोन करून कायद्याला अडचणीत आणण्याचे काम करतात अशाच संघर्षात्मक भूमिकेतुन वादाला वाद वाढत जावून सरकारी कामाात अडथळा असा 353 चा गुन्हा उरावर घ्यावा लागतो. काही पोलीसांचा कायद्याच्या नावाखाली वाहन चालकांची लूट कशी करता येईल यावर फोकस असतो.त्यामुळेच सर्वसामान्यामध्यें वाहतूकीच्या कर्मचार्यांविषयी एक प्रचंड संताप आहे. पोलीस प्रशासनाही या घटनाचे आत्मपरिक्षण करताना दिसत नाही. त्यामुळे दोन्ही बाजू चुकीच्या असल्याने व साधक यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे रहावे लागते.सध्या गणेशोत्सव आहे पोलीसांना या काळात रात्रीचा दिवस करून डयुटया कराव्या लागतात. कामाचा अतिरिक्त ताण, पुरेशा झोपेचा अभाव, वाद्याचा दणदणाट, कार्यकर्त्याची मुजोरी त्यामुळे माणूस असणार्या पोलीसांची ही चिडचिड होणारच तीही मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. भाजप आमदार नारायण कुचेकर यांनी धमकी दिल्याने पोलीस कर्मचारी आत्महत्येचा प्रयत्न करतात ही ढासळती मानसिकता व्यवच्छेदक समाजाचे लक्षण आहे. महाराष्ट्राला बिहारच्या सरंजामी व्यवस्थेत जावून चालणर नाही पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षीत यांनीही पोलीसांना हात लावाल तर खबरदार असा इशारा दिला आहे. पोलीस हे जनतेचे सेवक आहे व जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे तसेच पोलीस यंत्रणा ही आपल्या सुरक्षेचा भाग आहे. अशा जबाबदार्या समाजाच्या दोन्ही बाजूनी लक्षात ठेवायला हव्यात. तरच कायद्याची बुज खर्या अर्थाने राखली जाणार आहे.
खाकीच्या अस्मितेवरच घाला
RELATED ARTICLES