सातारा : उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाजवळील घाडगे हॉस्पिटल ते जिल्हा परिषदेकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला असणार्या विजेच्या खांबाला कार धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातामध्ये दाम्पत्य बचावले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुबेर विनायक मंदिर जवळून उताराने जाणार्या रस्त्याच्या चौकमार्गे जि.प. कडे जाणार्या मार्गावर विजेचा खांब रस्त्याच्या कडेला उभा आहे. मात्र पोलवर विद्युत बल्ब लावला नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. या मार्गावरून कार मधून एक दाम्पत्य जात असताना त्यांची कार विजेच्या पोलवर धडकून कारचे दर्शनी भागाच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कारमधील दाम्पत्य किरकोळ जखमी होऊन बचावले आहेत. विज वितरण कंपनीने विजेचा पोल स्थलांतर करण्यासाठी 1 लाख 54 हजार रूपयाची बजेटमध्ये तरतुद करावी म्हणून प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झालेले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील रस्त्याच्या कडेला विजेचा पोल तातडीने स्थलांतरीत करावा अशी मागणीही होत आहे.
(छाया : संजय कारंडे)