भिलार : बनावट कागदपत्रे बनवुन कलकत्ता येथे सुमारे साडे तीन कोटी रुपयांचा गंडा घालून फरार असलेल्या अट्टल ठगाला पाचगणी पोलिसानी सापळा रचून गजाआड केले. या कामगिरीमुळे पाचगणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे व त्यांच्या सहकार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की गुजरात येथील रहिवासी असणारा भावेश हरीहर भट (वय 53) हा मोठा उद्योजक असून त्याचा व्यवसाय पश्चिम बंगाल, मुंबई व इतरत्र चालू आहे. तो मुंबई येथे वास्तव्यास असतो तर पाचगणी या पर्यटन स्थळावरही त्याचा मोठा बंगला आहे. कधी कधी तो पाचगणी येथेही राहावयास येत असतो. व्यवसायदारम्यान भावेश भट याने दुर्गापूर, कलकत्ता येथे बर्याच लोकांना बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातला आहे. सुमारे साडे तीन कोटीपेक्षाही जास्त रुपयांचा अपहार भावेश याने केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात बनावट कागदपत्रे बनवणे, फसवणूक,रकमेचा अपहार असे गुन्हे दुर्गापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे कलकत्ता पोलीस त्याच्या मागावर होते. तसेच त्याचेवर दुर्गापूर सेशन कोर्टाचे वॉरंट होते.
भावेश भट याचा पाचगणी येथे बंगला असल्याने पांचगणी पोलिसाना तपासासाठी सहभागी केले होते. गेले काही दिवासापासून पाचगणी पोलीस त्याच्या बंगल्यावर पाळत ठेवुन होते परंतु भावेश पोलिसांना चकवा देत होता. सपोनि तृप्ती सोनावणे याना तो मुंबई येथे असल्याची माहिती मिळाल्यावर त्या स्वतः व कर्मचारी प्रवीण महांगडे, जितेंद्र कांबळे, महिला पोलीस वैशाली फरांदे यांचे पथक मुंबईला रवाना झाले. कांदिवली मुंबई येथून भावेश भट याला ताब्यात घेतले. व महाबळेश्वर येथील कोर्टात हजर केले .त्यानंतर तपास पूर्ण करून भावेश भटला दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. या कामगिरीमुळे पाचगणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.