कोरेगाव : महावितरण कंपनीकडून कोरेगाव शहर आणि परिसरावर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अन्याय होत आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याने व्यापारी, व्यावसायिकांसह नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. कोरेगावात कार्यरत असलेले अभियंते कागदोपत्री घोडी नाचवत असल्याच्या निषेधार्थ कोरेगाव नगरविकास कृती समितीसह विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन पुकारलेल्या कोरेगाव बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात महावितरणचे उच्चपदस्थ अभियंते आणि आंदोलनकर्त्यांची संयुक्त बैठक झाली, त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर बंद मागे घेण्यात आला.
वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा
गेल्या दीड महिन्यांपासून वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले होते. महावितरण कंपनीच्या शहर कार्यालय व उपविभागीय कार्यालयाकडे दि. 25 मे 2016, 14 जून 2016 व दि. 7 जुलै 2016 अशी सलग निवेदने देऊन व दररोज तक्रारी करुनही या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देण्यात आले नव्हते. उच्चपदस्थ अभियंत्यांनी केवळ आश्वासने देवून कोरेगांवकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला होता. दि. 8 जुलै रोजी तर महावितरणच्या सातारा विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता के. वाय. देशपांडे व उपकार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांनी लेखी आश्वासन देऊन यापुढे वीज खंडीत होणार नाही, कामकाजात सुधारणा करु अशी ग्वाही दिली होती.
शहराचा व्यापार कोलमडला
त्यानंतर दुसर्याच दिवसापासून म्हणजे दि. 9 जुलै 2016 पासून दि. 11 जुलै पर्यंत दररोज 5-5 तास वीज प्रवाह खंडीत करुन कोरेगांवकरांना हैराण केले आहे. कोरेगांवचा आठवडा बाजार असणार्या सोमवारी म्हणजे दि. 11 जुलै 2016 रोजी तर सकाळी 11.30 पासून रात्री 9 वाजेपर्यंत सलग साडेनऊ तास वीज खंडीत ठेवून वीज गङ्घाहकांना लाखोंचा भुर्दंड सोसावा लागला होता. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कोरेगांवकरांचा संयम सुटला आणि बुधवार दि. 13 जुलै 2016 पासून संपूर्ण कोरेगांव शहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
कडकडीत बंदमुळे शहरात शुकशुकाट
शहरात बुधवारी सकाळपासून शहरवासियांसह व्यापारी, व्यावसायिक, लघु उद्योजक व नागरिक उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी झाले. कोणतेही आवाहन न करता शहरात पहिल्यांदाच बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक जर्नादन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक राजेद्र यादव व अशोक पाटील यांनी देखील शहराच्या प्रत्येक भागात लक्ष केंद्रीत केले होते. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यावसायिक बंदमध्ये सहभागी झाल्याने नेहमी गर्दीने गजबजलेली ठिकाणी शांत होती. विशेष म्हणजे शहरात दिवसभर वीज पुरवठा सुरळीत सुरु होता.
कोरेगावमध्ये सर्वपक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES