पाटण शहर व तालुक्यातील बहुतांशी गावात संचारबंदी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

पाटण :- सातारा जिल्हा व प्रामुख्याने कराड तालुक्यातील कोरोना रूग्नांची वाढती संख्या लक्षात घेता रविवारपासून पाटण तालुक्यातील बहुतांशी गावात कडक केलेल्या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाटण शहरासह तालुक्यातील मोठी गावे, स्थानिक बाजारपेठा या शंभर टक्के बंद पाळण्यात आल्या. केवळ दवाखाने व घरपोच औषध सेवा आदी अपवादात्मक अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र शंभर टक्के लॉकडाउन यशस्वी करण्यात येथे प्रशासनाला यश आले आहे.

तब्बल सव्वा महिन्याहून अधिक काळ पाटण शहर व तालुक्यात लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने यात शिथीलता आणण्याचे धोरण जाहीर केले त्याचवेळी सातारा जिल्हा आधी ऑरेंज झोनमध्ये होता तो रेड झोनमध्ये गेला. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना त्याची सर्वाधिक संख्या ही कराड तालुक्यातील होती. शनिवारी तर कराड येथे एकाच दिवसात तब्बल १२ कोरोना रूग्न सापडले. कराड नजीकच असलेला पाटण तालुका त्यातही येथे मुंबई, पुणे आदी शहरातून हजारोंच्या संख्येने आलेल्या लोक यामुळे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव होवू शकतो. याच पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी रविवारपासून पाटण शहरासह तारळे, मल्हारपेठ, नाडे, नवारस्ता, ढेबेवाडी, तळमावले आदी बहुतांशी ठिकाणी दवाखाने आणि अपवादात्मक अत्यावश्यक सेवा कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाटणचे उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. पाटील आदींनी केलेल्या आवाहनाला तालुक्यातील जनतेनेही मोठा प्रतिसाद दिला आहे.

यामुळे दैनंदिन अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाजारपेठा व रस्त्यांवर होणारी गर्दी आपोआपच कमी झाली आहे. सर्वत्र शुकशुकाट असल्याने पोलीस व प्रशासनावरचा ताणही कमी झाला आहे. दरम्यान पुढील आदेश होईपर्यंत याची कडक अंमलबजावणी करणे हे सर्वांवरच बंधनकारक असल्याने यात सहकार्य करण्याचे आवाहन श्रीरंग तांबे यांनी केले आहे.