सातारा : सातारा नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट जनतेतून निवडणून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी गुरुवारी पालिकेत पदभार स्विकारला. यावेळी खा. उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले उपस्थित होत्या. दरम्यान, पालिकेतील साविआ, नविआ आणि भाजपच्या नगरसेवकांनाबरोबर घेवून स्वच्छ, सुंदर आणि विकासित सातारा करणार, असल्याची भूमिका सौ. कदम यांनी जाहीर केली.
पदभार स्विकारल्यानंतर पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सौ. कदम म्हणाल्या, खा. उदयनराजेंनी सर्व सामान्य कुटुंबातील महिलेला थेट नगराध्यक्ष पदावर बसवले. त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्व नगरसेवकांना बरोबर घेवून दिलेली जबाबदारी पुर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खा. उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा नगरनगर परिषदेत नगर विकास आघाडी व भाजपच्या नगरसेवकांना बरोबर घेवून आगामी पाच वर्षात कारभार चालेल. त्यामुळे सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. विनाकारण वादावादी न घालता विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. निवडणुकीदरम्यान, सातारा विकास आघाडीकडून सातारकरांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. सातारचा विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी सामुहिकरित्या आहे.
सातारा विकास आघाडीतर्फे निवडणुकीच्या उतरलेले उमेदवार हेच माझ्यासाठी नगरसेवक आहे. साविआचे 22 नगरसेवक असले तरी माझे 40 उमेदवार हे माझ्यासाठी नगरसेवक आहेत. निवडणुकीत माघार घेतलेल्या आणि पराभूत उमेदवारांना लवकर स्विकृत सदस्य तसेच विविध समितींमध्ये घेवून त्यांना काम करण्याची संधी दिली जाईल. त्यांनी आपआपल्या प्रभागातील विकासकामांची यादी तयार करुन द्यावी. त्यांची सर्व कामे मार्गी लावली जातील.
महाराज तेच मी मात्र ‘लोकसेवक’
सातार्यात दादागिरी आणि दहशत असती तर सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री नगराध्यक्ष झाली नसती. शहरात कोणी आर्थिक दहशत माजवली हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे दुसर्यांवर आरोप करताना जारा भान ठेवावे. मी महाराज नसून लोकसेवक आहे. तेच महाराज आहे, असा टोला खा. उदयनराजे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावला. अरबी समुद्रात होऊ घातलेल्या शिवस्मारकाविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले, हा निर्णय आधीच व्हायला हवा होता. छ. शिवरायांचे सर्वसमभावाचे विचार जागतिक पातळीवर रुजलेले आहेत. त्याची आठवण करणे गरजेचे असून त्यासाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत. लोकशाही बळकट होण्यासाठी अशा युग पुरुषांची आठवण गरजेचे आहे. अन्यथा अमेरिकेत ज्या पध्दतीने 50 राज्यांचे वेगवेगळे भाग झाले तशी भारतीय लोकशाहीची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. देश अंखड राहिला पाहिजे या स्मारकामुळे ज्या कोळी बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यांना राज्य शासनाने पर्याय दिला पाहिजे. कारण कोळी बांधवांच्याही स्वराज्याचे जडण-घडणीत फार मोठे योगदान होते.