Saturday, September 23, 2023
Homeठळक घडामोडीसातार्‍यात लवकरच पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा :- एस. एम. देशमुख ; अधिस्वीकृती समितीचे...

सातार्‍यात लवकरच पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा :- एस. एम. देशमुख ; अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद सातार्‍याला हे परिषदेसाठीही भूषणावह

सातारा : मराठी पत्रकार परिषद ही शतक महोत्सव गाठणारी संघटना आहे. पत्रकारितेसाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी पत्रकार संघटना टिकली पाहिजे. संघटनात्मक कामगिरीमुळे राज्यात पत्रकारांची मोठी ताकद निर्माण झाली आहे. पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा घ्यावी, असा आग्रह राज्यातील डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा आहे. मात्र सातार्‍यातील पत्रकार उत्साहाने काम करत असून ते आपुलकीने परिषदेकडे पाहतात. त्यामुळे ही कार्यशाळा सातार्‍यातच घेतली जाईल. पुणे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद सातार्‍याला व हरीष पाटणे यांना मिळाले हे परिषदेसाठी भूषणावह आहे, असे गौरवोद्गार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी काढले.

मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने एस. एम. देशमुख सातार्‍यात होते. यावेळी डिजिटल मिडिया परिषदेच्यावतीने राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून एस. एम. देशमुख व पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी हरीष पाटणे यांची निवड झाल्याबद्दल दोघांच्याही सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख दिपक शिंदे, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, दै. पुढारीचे विभागीय व्यवस्थापक व जेष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, तुषार भद्रे, अरविंद मेहता, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष सनी शिंदे प्रमुख उपस्थित होते.

एस. एम. देशमुख म्हणाले, हरीष पाटणे यांच्याकडे नेतृत्वगुण आहे. आम्हाला त्यांना सातार्‍यापुरते मर्यादित ठेवायचे नाही. महाराष्ट्रातून सक्रिय 25 जणांची टीम आम्ही करत आहोत. त्यात हरीष पाटणे यांच्यासारखे तरूण सहकारी अग्रभागी असतील. 85 वर्षे जुनी व 15 वर्षांनी शतक महोत्सव गाठणारी ही संघटना आहे. पत्रकारितेसाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी ही पत्रकार संघटना टिकली पाहिजे. त्यासाठी तरूण पत्रकारांच्या हाती संघटनेचे नेतृत्व जायला हवं, यासाठी टीम तयार करत आहे. सातार्‍यातील डिजिटल मिडिया परिषदेचे काम सनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. त्यांना राज्यपातळीवर संधी देण्यासंदर्भात पदाधिकार्‍यांशी चर्चा करू. डिजिटल माध्यमाचीही नोंदणी करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार आहे. डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा घ्यावी, असा आग्रह राज्यातील पत्रकारांचा आहे. सातार्‍यातील पत्रकार उत्साहाने काम करत असून ते आपुलकीने परिषदेकडे पाहतात. त्यामुळे ही कार्यशाळा पुढच्या महिन्यात सातार्‍यात झाली तर सर्वांसाठी सोयीचे होईल. मात्र त्याचवेळी मुद्रित माध्यमांप्रमाणे डिजिटल माध्यमांनीही विश्वासार्हता जपणे गरजेचे आहे. अधिस्वीकृती समितीवर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी असल्याने डिजिटल मिडियाचाही प्रतिनिधी असावा यासाठी प्रयत्न करणार आहे. मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद आणि आता पत्रकार हल्ला विरोधी परिषद ही विंग सुरू करण्यात आली आहे. समन्वयक व निमंत्रक यांचे काम तालुका पातळीवर काम सुरू करावे. संघटनात्मक कामगिरीमुळे राज्यात पत्रकारांची मोठी ताकद निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

हरीष पाटणे म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पत्रकार संघ महाराष्ट्रभर लोकप्रिय केला. आंदोलनांसाठी कायम रस्त्यांवर उतरलो, अनेकांना मदती केल्या, संघटना ग्रामीण पातळीपर्यंत बांधली. अनेकजण नेता म्हणत असले तरी कार्यकर्त्याच्या भावनेने संघटनेत काम करत राहिलो. त्याच आशीर्वादामुळे महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीवर बिनविरोध निवडून गेलो. ज्यांनी ज्यांनी या कामात सहकार्य केले, त्यांना त्यांना विसरणार नाही. अधिस्वीकृती प्रक्रियेत सुरळीत व सुटसुटीतपणा येईल यासाठी प्रयत्न करू. सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांनी यासंदर्भात लिखित सुचना माझ्याकडे पाठवाव्यात. राज्य समितीकडे आमचा त्यासाठी पाठपुरावा राहिल. लवकरच डिजिटल मिडिया परिषद, हल्ला विरोधी कृती समिती, इलेक्ट्रॉनिक मिडिया व सातारा जिल्हा पत्रकार संघाची पुनर्रचना करू. तत्पूर्वी उद्घाटनासाठी सज्ज असलेल्या सातारा जिल्हा पत्रकार संघाचे शानदार उद्घाटन करू, असेही पाटणे म्हणाले.

विनोद कुलकर्णी म्हणाले, जिल्ह्यात हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाचे काम उत्कृष्टपणे सुरू आहे. त्यांना विविध संघटनांच्या पुर्नरचनेचे अधिकार द्यावेत. सोशल मिडियाची नवी कार्यकारिणी आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाची नवी विंग दोन महिन्यात उभी करूया. जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची रचना हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली करूया. संघटना भक्कम करण्यासाठी नेता खमक्या असावा लागतो. त्यामुळे पदांवर कुणीही बसले तरी यापुढेही सातारा जिल्ह्याची पत्रकार संघटना हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखालीच काम करेल. यावेळी सर्व तालुक्यांतून आलेल्या पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष सनी शिंदे यांनी आपल्या कामाचा अहवाल दिला. दिपक शिंदे, अरविंद मेहता, जयदीप जाधव, शशिकांत गुरव, तुषार भद्रे, गजानन चेणगे, जयंत लंगडे, विनीत जवळकर, अजय कदम, जयवंत पिसाळ, महेश चव्हाण, अविनाश कदम यांनी मनोगत व्यक्त केले.पद्माकर सोळवंडे यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular