Saturday, March 22, 2025
Homeकृषीअजिंक्यतारा कारखान्याच्या कामगारांची दिवाळी गोड, ऊसाला मिळणार किफायतशीर दर

अजिंक्यतारा कारखान्याच्या कामगारांची दिवाळी गोड, ऊसाला मिळणार किफायतशीर दर

साताराः सातारा तालुक्यातील शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. शेतकर्‍यांची आर्थिक सुबत्ता आणि बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतून उभारलेला कारखाना आज स्वयंपुर्ण झाला आहे. कामगार हे कारखान्याचा कणा आहेत. अडचणीच्या काळात कामगारांनी पगाराची अपेक्षा न ठेवता काम केले आहे. त्यांचे योगदान मोलाचे असून कारखाना स्वयंपुर्ण करण्यामध्ये कामगारांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्काचे मिळणे आवश्यक असून संचालक मंडळाने कामगारांना 20 टक्के दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करुन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा साखर कारखान्यातील कामगारांची दिवाळी गोड केली. दरम्यान, आगामी गळीत हंगामासाठी गाळपास येणार्‍या ऊसाला जिल्ह्यात जो दर निश्‍चित होईल त्यानुसार आपला कारखाना दर देेईल असे सांगून सभासद, शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी संचालक मंडळ कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितली.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या 33 व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे, संचालिक श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, श्रीमंत छ. रूद्रनीलराजे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सतीश चव्हाण, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सदस्य जितेंद्र सावंत, राजू भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, संचालिका सौ. कांचन साळुंखे, पंचायत समितीच्या सभापती सौ. कविता चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा व राज्याबाहेरच्या कारखान्यांच्या भूलथापांना बळी पडून कोणीही इतर कारखान्यांना ऊस घालू नये. अशा भूलथापांना बळी पडलेल्या शेतकर्‍यांना त्या- त्या कारखान्याने सर्व पेमेंट अदा केले का? शेतकर्‍यांना किती कटू अनुभव आले, याची जाणीव सर्वांनी ठेवून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकर्‍यांनी नोंदीचा ऊस गाळपासाठी अजिंक्यातारा कारखान्यालाच पाठवावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. कारखान्याच्या अधिकारी, कर्मचारी आणि कामागारांच्या  परिश्रमामुळे आज कारखाना प्रगतीपथावर आहे. कारखाना पुर्णपणे कर्जमुक्त झाला असून यामध्ये कामागारांचे योगदान महत्वाचे आहे. कारखान्यात काम करणारा कामगार हा आपलाच मुलगा आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे मिळालेच पाहिजे. प्रत्येक गळीत हंगाम यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी कामगारांचे बहुमोल सहकार्य लाभलेले आहे. ही बाब कधीही विसरता येणार नाही. येत्या दिवाळी सणात कारखान्याचे अधिकारी, कामगार- कर्मचारी यांचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी 20 टक्के बोनस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून येत्या 3- 4 दिवसांत बोनसची पुर्ण रक्कम कामगारांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी जाहिर केले.
कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी स्वागत केले. व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे यांनी प्रास्ताविक केले. संचालक नितीन पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य जयवंत कुंभार, राहूल शिंदे, माजी सभापती धर्मराज घोरपडे, माजी उपसभापती दादा शेळके, तानाजी तोडकर, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुर्यकांत धनवडे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गणपतराव शिंदे, संचालक सुनिल काटे, सूत गिरणीचे अध्यक्ष रामचंद्र जगताप, उपाध्यक्ष देवरे, आण्णाबापू सावंत, सातारा बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, संचालक श्रीरंग देवरुखे, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण फडतरे, अन्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, , कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular