पुणेः दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे जोरदार पडसाद पुण्यात उमटले. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
भगवानगड येथील मेळाव्यात बोलताना जानकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील हिंगण्यातील जानकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह कार्यकर्ते या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जानकर यांनी ज्या भाषेत टीका केली ती राज्याचे सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. जानकर हे पुण्यात कधी येतात याची आम्ही वाट पहात आहोत. त्यांनी केलेल्या विधानांचा त्यांना पश्चात्ताप होईल, अशी अद्दल राष्ट्रवादी घडवेल, असाही इशारा काकडे यांनी दिला आहे.
राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या कार्यालयाची राष्ट्रवादीकडून तोडफोड
RELATED ARTICLES