Wednesday, March 19, 2025
Homeठळक घडामोडीदुर्ग संमेलन स्वागताध्यक्षपदी श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर

दुर्ग संमेलन स्वागताध्यक्षपदी श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर

महाराष्ट्राला दिशा देणारे संमेलन पार पाडण्याची दिली ग्वाही; किल्ले सुंदरगडावर लगबगीला सुरूवात
 पाटण:शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती, राजधानी सातारा व महाराष्ट्रातील सुमारे तीस शिवभक्त संस्था-संघटनांच्या माध्यमातून दुर्ग संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा चौथे दुर्गसंमलेन पाटण येथील सुंदरगडावर (घेरादात्तेगड) दि. 11 व 12 नोव्हेंबर रोजी आयोजित होणार असून याच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर तथा सरकार यांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, प्रा. कुलदीप देसाई, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे या श्रेय नामावलीत सहभागी होता आले, हे माझ्यासह पाटण तालुक्याचे भाग्य असल्याची भावना श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केली.
शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व विविध संघटनांच्या पदाधिका़र्‍यांची बैठक पाटण राममंदिर येथे पार पडली. यावेळी टाळयांच्या गजरात व घोषणांच्या निनादात श्रीमंत  सरदार विक्रमसिंह पाटणकर तथा सरकार यांना मानाची पगडी, तलवार, शेला व पुष्पहार प्रदान करून स्वागताध्यक्षपद बहाल करण्यात आले. यावेळी प्रा. के. एन. देसाई, संस्थापक सुदामदादा गायकवाड, श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर, उपनगराध्यक्ष दिपक शिंदे, शस्त्रसंग्राहक विक्रमसिंह पाटील, इतिहास अभ्यासक अजयदादा जाधवराव, महेश पाटील, शेखर तोडकर, शरद पवार, धैर्यशील पाटणकर, माजी सरपंच संजय चव्हाण,  चंद्रकांत मोरे, अनिल मोहिते, यशवंतराव जगताप, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, अनिस चाऊस, गणेश लुगडे, पंकज मुळे, संतोष लोहार, टोळेवाडी माजी सरपंच नारायण डिगे, दिपक जाधव, संजय जाधव, अजय कवडे,  किरण पवार, उमेश टोळे, व संमेलनाचे निमंत्रक दीपक प्रभावळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दुर्गसंमलेन हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे, की ज्यात प्रत्यक्ष किल्ल्यांचा सहवास तसेच शिवव्याख्यानांसोबतच दुर्गपर्यटनाचा साक्षात्कार होतो. राज्याच्या बहुतेक जिल्हयांचा सहभाग असणारी ही योजना देशाच्या अन्य कोणत्याही राज्यात दिसून येत नाही. या संमेलनात स्वागताध्यक्ष हेच सर्वात मान्यवर पद मानले जाते. यापुर्वी राज्यातील मान्यवरांच्या श्रेय नामावलीत आज सरदार पाटणकर घराण्याला निमंत्रित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. विक्रमसिंह पाटणकर यांच्या घराण्याने शिवकाळात तसेच त्यांच्या पश्चातही सातत्याने छत्रपती घराण्यासोबत दाखवलेली एकनिष्ठता हे स्वराज्यातील एकमेव उदाहरण आहे. याच घराण्याने संताजी-धनाजी यांच्या तोडीला तोड पराक्रम गाजवले. सरदार पाटणकर घराणे पानिपतातही लढले अन् दक्षिण विजयांत याच घराण्याच्या पुर्वजांनी हौताम्त्य स्वीकारले. संभाजीराजेंच्या पश्चात मराठेशाही विस्कळीत होत असताना साऱया मराठी मुलुखात स्वामीनिष्ठा व राजनिष्ठेचा संस्कार या सरदार पाटणकर घराण्याने रूजवला.
दस्तुरखुद्द छत्रपती शिवरायांनी लिहिलेले पत्र व स्वतः रामदास स्वामींनी दिलेली राममूर्ती हे या घराण्याला लाभलेली शक्ति आणि भक्तीची विलक्षण आयुधे आहेत. छत्रपती घराण्याकडून हत्ती म्हणजेच गजांतलक्ष्मी भेट मिळणे किंवा पाच हजाराचे घोडदळ ठेवण्याचे आदेश-परवाना मिळणे ही राज्यभरातील एकमेव घटना असल्याचेही इथे मान्यवरांनी आपल्या विवेचनांत सांगितले.
आपल्या घराण्याचा योग्य सन्मान ठेवण्यासह त्यात योगदान देताना श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांनी त्याचे भांडवल केले नाही. तर उलटपक्षी त्यांनी काळाच्या ओघात स्वतः सामान्य होऊन जनसेवेचा घराण्याचा वसा वृद्धीगंत केला. मराठयांच्या साम्राज्यात सर्वाधिक विस्तार करणारे सातारा स्थापक छत्रपती शाहू महाराजांनी जसा उन्माद केला नाही कि त्याचा उपभोगही घेतला नाही त्याप्रमाणे यांनीही घराणेशाहीचा उन्माद न करता, भांडवल न करता केवळ लोककल्याणासाठी त्याचा उपयोग करून घेतला. घराण्याची परंपरा व वैयक्तिक जिवनांत त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊनच त्यांना स्वागताध्यक्षपद बहाल करत असल्याचे प्रा. के. एन. देसाई यांनी सर्वांच्या मते जाहीर केले.
शिवभक्तीचा अखंड जागरः 36 तासांचे शिवतांडव
यंदा चौथ्या दुर्ग संमेलनात महाराष्ट्रभरातील शिवव्याख्याते तसेच दुर्गप्रेमी, दुर्गपर्यटनाचे अभ्यासक सहभागी होत असून संमेलनात शिवभक्तीचा अखंड जागर होणार आहे. शोभायात्रा, दुर्ग-ध्वज पुजन, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, स्लाईड शो, दांडपट्टा शस्त्रांचे प्रशिक्षण, शाहिरी कार्यक्रम, मराठमोळया स्पर्धा, व्याख्यान, प्रात्यक्षिके असा 36 तासांचा अक्षरशः शिवतांडव होणार आहे. त्याची पुर्णतः माहिती देऊन त्याचे तंतोतंत नियोजन येथे सुरू करण्यात आले.
उत्कृष्ठ संमेलनाचा पायंडा याच मातीत उभा करू-पाटणकर
सरदार पाटणकर घराण्याने स्वराज्य उभारणीत व विस्तारात दिलेले योगदान अलौकीक आहे. या घराण्याचे वंशज असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पाटणकर घराण्याबरोबरच इथल्या प्रत्येक घराने योगदान दिले आहे. समाजकारण करताना मी जनसेवेची परंपरा खांद्यावर घेतली व अखंडपणे त्यासाठीच काम केले. गेल्या चाळीस वर्षांत बाळ सरकार असताना तुमचा दादा कधी झालो हेच कळले नाही. स्वराज्यातील प्रत्येकजण आपलाच आहे, या भावनेने गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे काम करत राहिलो. सामान्य जनतेच्या सेवेसाठी झगडण्याचा वसा घराण्याच्या वारशातुन मिळाला. या संमेलनाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा बाळ सरकार झाल्यासारखे वाटत असल्याचे पाटणकर सरकार यांनी सांगताच उपस्थित पदाधिकारी हेलावून गेले. याचवेळी त्यांनी दातेगडावर पार पडणारे यंदाचे चौथे दुर्ग संमेलन हा उत्कृष्ठ संमेलनाचा पायंडा असेल, अशा पद्धतीने साकार करू अशी ग्वाही देताच टाळयांच्या कडकडाटात त्यांना दुजोरा मिळाला.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular