सातारा : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलक्रांती झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी पाणी बचतीचा संदेश द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शाहूपुरी येथील श्री गजानन गणेशोत्सव मंडळात संवादपर्व -2016 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. मुद्गल बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा अधीक्षक जितेंद्र शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते,पोलीस निरीक्षक आर.सी. पिसाळ, पत्रकार विजय मांडके, मंडळाचे अध्यक्ष अक्षय भोसले, उपाध्यक्ष दीपक यादव आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा माहिती कार्यालय निर्मित जलयुक्त माहिती पट प्रदर्शित करण्यात आला. संवादपर्व -2016 या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती गणेशोत्सव काळात जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. मुद्गल पुढे म्हणाले, सातारा नगर परिषदेचा अमृत या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील पायाभूत सुविधेवर भर देण्यात येणार आहे. केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान शहरी तसेच ग्रामीण भागात राबवत आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी अनुदानही देण्यात येणार आहे.
शासनाने सेवा हमी कायदा सुरु केलेला आहे. या सेवा हमी कायद्यांतर्गत 50 सेवा या ऑनलाईन व कालबद्ध पद्धतीने देण्यात येणार आहे. डॉल्बीमुळे स्त्रीया, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होवून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी शेवटी केले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यावेळी म्हणाले, सुशिक्षित गुन्हेगार सायबर गुन्हेगारीमध्ये सक्रीय आहेत. हॅकींगसारखे प्रकार तज्ज्ञ मंडळीच करु शकतात. अशा गुन्हयांमध्ये तपास करतांना मुंबई येथील लॅबमध्ये धाव घ्यावी लागत असे यामध्ये वेळ जात होता. जनतेने आता चिंता करण्याचे काम नाही सायबर लॅबच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक बसेल आणि समाजाचे संरक्षण करता येईल. डिजिटल युगामुळे माहिती तंत्रज्ञानच्या वापराने क्रांतिकारक बदल केले आहेत परंतु या युगात वेगवेगळे गुन्हे घडत आहेत. या लॅबमुळे लवकर तपास होण्यासाठी वापर होईल त्याशिवाय गुन्हेगारीवर जरब बसेल
छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये महिला तक्रारी देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. समाज कंटकांवर जरब बसविण्यासाठी व महिलांवर छेडछाडीचे प्रकरणे होऊ नयेत म्हणून निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, महत्वाचे चौक, विद्यालय, महाविद्यालय येथे निर्भया पथकातील पोलीस साध्या वेशात तैनात करण्यात आले आहेत, असे सांगून श्री. पाटील पुढे म्हणाले, या ठिकाणी छेडछाड करणार्या समाजकंटकांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. अशा समाजकंटकांवर पहिला छेडछाडीच्या प्रकरणात गुन्हा न नोंदविता त्यांच्या कुटुंबासमोर पोलीस ठाण्यात समुपदेशन करण्यात येणार आहे. दुसर्यांदा पुन्हा छेडछाडीच्या प्रकरणात आढळल्यानंतर अशा समाजकंटकांवर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. निर्भया पथक ही संकल्पना पश्चिम महाराष्ट्रात संपूर्णपणे राबविण्यात येणार आहे.
महिलांवरील छेडछाडी रेाखण्यासाठी पोलीस विभागामार्फत जनजागृतीही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष अक्षय भोसले यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पत्रकार विजय मांडके यांनी केले. या कार्यक्रमास शाहूपुरी येथील नागरिक, महिला, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्वजनिक गणेश मंडळांनी पाणी बचतीचा संदेश द्यावा:जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES