खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेबाबत लवकर धोरणात्मक निर्णयाचे ना. भामरे यांचे आश्वासन
सातारा : सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नेहमीच विकासाचा दृष्टीकोन ठेवून वर्तमानामध्ये नियोजनबध्द कार्य करणारे उमदे आणि दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत, त्यांच्या याच भुमिकेतुन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देशाचे संरक्षण राज्यमंत्री ना.सुभाष भामरे यांना देशातील महिलांची पहिली सैनिक शाळा सातार्यात स्थापन करण्याबाबत प्राथमिक निवेदन दिले असून, ना. सुभाष भामरे यांनी देखिल महिलांचे सैनिक शाळा सुरु करण्याबाबतची नवीन संकल्पना आपण प्रथमच मांडत आहात, यावर शक्य तितक्या लवकर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असे ठोस आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिले.
देशाचे संरक्षण राज्य मंत्री ना.भामरे हे सैनिक स्कूल असोशिएशनच्या पूर्णतः गोपनीय असलेल्या महत्वाच्या बैठकीसाठी सातारा सैनिक स्कूल येथे आले असताना, त्यांचे जिल्हावासियांच्या वतीने स्वागत करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सैनिक स्कूल हेलीपॅडवर डॉ.सुभाष भामरे यांना महिला सैनिक स्कुल स्थापन करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतचे प्राथमिक निवेदन दिले.
खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, सातारा जिल्हा शूरवीरांचा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला, क्रांतिकारक,आजी-माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून संपूर्ण देशात सुप्रसिध्द आहे. सातारा भुमीने अनेक नरवीर देशाला दिले आहेत, तर देशाला दिशा देण्याचेही काम सातारा जिल्हयातील सुपूत्रांनी केले आहे.
सध्या सर्वत्र अराजकता माजल्याचे दिसून येत आहे, संपूर्ण देशात विशेषतः महिला-भगिनींवर होणार्या अत्याचाराच्या घटना मन विषण्ण करणार्या घडत आहेत. महिलांनी आता खर्या अर्थाने सबला होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. सक्षम शासक म्हणून महिलांना लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षण देणे हे आपले प्रथम कर्तव्य बनले आहे. म्हणूनच महिला सैनिक शाळा सुरु करणे हा अशा अराजक परिस्थितीवर मात करण्याचा एक उपाय होवू शकतो. अशी देशातील पहिली महिला सैनिक शाळा सातार्यात व्हावी अशी आमची आग्रही मागणी आहे. निवेदन देताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समवेत, अमरदादा जाधव,डॉ.चंद्रशेखर घोरपडे, अशोक सावंत, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस प्रमुख संदीप पाटील, सैनिक स्कूलचे प्राचार्य विंग कमांडर मुजुमदार, रजिस्ट्रार कर्नल नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.