म्हसवड (विजय भागवत) : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या म्हसवड येथील अनेकांचे कुलदैवत व गावाचे ग्रामदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळा कार्तिक शुध्द 1 2 (बारस- तुलसी विवाह म्हणजे) बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी) रात्री 12 वाजता पारंपारिक पद्धतीने सुमारे दीड लाख भाविकांच्या उपस्थिती मोठ्या थाटात संपन्न झाला.
संपूर्ण एक महिनाभर चालणार्या श्रींच्या या मंगल विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला. तुळशी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी सालकरी दिपक गुरव यांच्या हस्ते आरती करून मानकरी,सेवेकरी व नवरात्रकरी यांच्या उपस्थितीत श्रींचे घट उटविण्यात आले. घट उटविल्यानंतर बारा दिवसाच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होवून उपवास सोडण्यात आले. या सोहळ्यासाठी चार वाजल्यापासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. विवाहासाठी श्री सिध्दनाथ हत्तीवरून गेले होते अशी अख्यायिका असल्याने व परंपरागत पध्दतीनुसार या मंदिरात बाहेरील मंडपात सहा फुट लांबी व साडेचार फुट उंची असलेला एक अखंड पाषाणाचा हत्ती आहे. या भव्य हत्तीची सजावट करण्यात आली. हत्तीला सर्व प्रकारचे साज व झुल घालण्यात आले. गळ्यातील घंटा पायातील साखळ्या आदी अलंकाराने हत्तीशोभिवंत करण्यात आला.
त्यानंतर सुशोभित केलेली अंबारी हत्तीवर बसविण्यात आली व संध्याकाळी पाच वाजता श्री सिध्दनाथांची पंचधातूची उत्सव मूर्ती हत्तीवरील सुशोभित केलेल्या अंबारीत विधीपूर्वक बसविण्यात आली. अर्थात विवाहाला जाण्यासाठी वर सज्ज झाला.फुलांच्या माळा, नारळाची तोरणे, ऊसाच्या मोळ्या,हत्तीच्या दोन्ही बाजूस दोन भव्य अशा पितळेच्या दीपमाळा (समया) आणि विद्युत आकर्षक रोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सुरखे सजविण्यात आला. दिवसभर दूरदूरवरून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढून मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप आले.
मंदिरातील श्री सिध्दनाथ – जोगेश्वरी यांच्या गाभार्यातील सिंहासनावर उभ्या असलेल्या पाषाण मूर्तींना वधू वरांना परंपरागत रिवाजाप्रमाणे रात्री 11 वाजता माने यांच्यातर्फे मानाचा संपूर्ण पोषाख सालकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रींच्या मूर्तीसमोर चौक भरण्याचे व तेल उतल्याचे काम परीट समाजातील महिलांनी केल्यानंतर सालकरी यांना हत्ती मंडपात आणण्यात आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास हत्तीवरील अंबारीत स्थापन्न केलेली श्री सिध्दनाथांची उत्सवमूर्ती सालकरी (हत्तीवर आरूढ झालेला नवरदेव) सालकरी यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभार्यात नेण्यात आली. बाहेरील हत्ती मंडपातून आतील गाभार्यात श्रींची मूर्ती नेत असताना हजारो भाविक श्रींच्या मूर्तीस स्पर्श करण्यास धडपडत होते.
भाविक पुढे जाण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत होत. भाविक व पुजारी मंडळी यांच्या ताकदीची ही रणधुमाळी सुमारे अर्धातास सुरू होती. शेवटी मोठी रस्सीखेच होवून श्रींची मूर्ती गाभार्यात नेण्यात आली. श्रींची मूर्ती गाभार्यात नेल्यानंतर जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर आंतरपाट धरून, पारंपारिक पध्दतीने, विधीपूर्वक पद्माकर शास्त्री वाळुंजकर व पिंटू पाठक या पुरोहितांकडून मंगलाष्टका म्हणून शास्तोक्त पध्तदीने श्रींचा विवाह सोहळा रात्री 12 वाजता सनई चौघडा, ढोल, गजी-झांज यांच्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या थाटातसंपन्न झाला.
श्रींच्या विवाहानंतरची वरात म्हणजे श्रींची रथयात्रा. ही रथयात्रा रविवार दि. 19 नोव्हेंबर रोजी असून या दिवशी पूर्ण एक महिनाभर चालणार्या याश्रींच्या शुभमंगल विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे. येथिल रथयात्रेसाठी दरवर्षी 6 ते 7 लाखा भविकांची उपस्थिती असते.