सातारा : कोरेगावचे आमदार व विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांना आगामी काळात पक्षाची महत्त्वाची जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. त्याची पुर्वतयारी म्हणून त्यांनी कोरेगाव मतदारसंघाचा व्याप थोडा कमी केला आहे. त्यासाठी पूत्र तेजसला युवकच्या जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून राजकारणात आणले आहे.
शशिकांत शिंदे यांना कोणताच राजकिय वारसा नसताना त्यांनी मंत्रीपदापर्यंत मजल मारली. जावली तालुक्यातील हुमगाव हे त्यांचे गाव. तसे जावली तालुक्यातील बहुतांशजण हे नोकरी, व्यावसायानिमित्त मुंबईलाच वास्तव्यास असतात. त्याप्रमाणे शशिकांत शिंदे शिक्षण पूर्ण झाल्यावर ग्रोसरी मार्केट ऍण्ड शॉप बोर्ड (मुंबई) येथे लिपिक म्हणून नोकरीस लागले. पण त्यांच्यातील नेतृत्व गुणांनी त्यांना गप्प बसून दिले नाही. ते माथाडी कामगार युनियनचे सेक्रेटरी झाले. एक एक करत माथाडी कामगार युनियनची पदे मिळवत ते माथाडी नेते झाले.
शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी जावली मतदारसंघातून शशिकांत शिंदे पहिल्यांदा निवडणूक लढले आणि आमदार झाले. नेतृत्व गुण आणि काळजाला भिडणारी भाषाशैली यामुळे त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली. जावलीचे आमदार, कोरेगावचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री आणि आता पक्षाचे विधी मंडळातील प्रतोद अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत.
आमदार शिंदे यांच्यातील हे सर्व गुण हेरून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राज्यस्तरावरील महत्वाची जबाबदारी देण्याचे संकेत त्यांना मिळाले आहेत. त्यानुसार येत्या दोन महिन्यात पक्षातंर्गत पदाधिकारी निवडीवेळी आमदार शिदेंवर राज्यस्तरावरील जबाबदारी दिली जाणार आहे. ती जबाबदारी प्रदेशाध्यक्षपदाची असल्याचे समजते. सद्या पक्ष विविध अडचणींतून मार्गक्रमण करतो आहे. त्यामुळे पक्षाला उभारी देणारा, प्रभावी अध्यक्षाच्या शोधात पक्ष आहे. शिंदेंनी पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदार्या पार पाडल्या आहेत. ते पवार कुटूंबियांचे विश्वासू आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला पसंती दिली जात आहे.
राज्य पातळीवरची जबाबदारी आली तर जिल्हा आणि त्यांच्या कोरेगाव मतदारसंघाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी त्यांनी आपला पूत्र तेजस शिंदे याला राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून राजकारणात आणले आहे. त्याच्याकडे कोरेगाव मतदारसंघावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे.