सातारा : महाराष्ट्रातील सधन कुटुंबाचा पक्ष असे विरोधक टिका करणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा येथील राष्ट्रवादी भवनात भटके व विमुक्त जाती जमाती समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव अवधूत यांनी पत्रकार परिषद घेतली. पण, राष्ट्रवादीशी संबंधित असूनही अवधूत यांना जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी भवनच्या शेजारील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधून पुण्याला जाणे पसंत केले. राष्ट्रवादी भवनमध्ये आजही भटक्या समाजाची भटकंती पाहून अनेक पत्रकारांनी राष्ट्रवादी नेत्यांना जाब विचारला. पण, नेते गप्प बसले.
भटक्या विमुक्त व निमभटके व ओबीसी, कुणबी मराठा यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे त्यासाठी घटनेमध्ये सुधारणा करावी. आर्थिक तरतूद करुन या समाजाला न्याय द्यावा या मागणीची माहिती देण्यासाठी मंगळवारी दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये भटक्या सेलचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव अवधूत यांच्या पत्रकार परिषदेसाठी प्रतिनिधी उपस्थित राहिले. पण, राष्ट्रवादी भवनमध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे यांच्यासह विधान परिषद मतदारांच्या संपर्काचे काम सुरु होते. त्यामुळे या ठिकाणी पत्रकार परिषद घेता येणार नाही. असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. त्यामुळे नाईलाजास्तव भटक्या सेलचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव यांना पत्रकारांनीच शेजारील हॉटेलमध्ये व्यवस्था केली. त्या ठिकाणी अवधूत, सरचिटणीस बाजीराव मसाळ यांनी पत्रकार परिषद उरकली. सध्या भटक्या समाजाला सामावून घेण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखत असताना राष्ट्रवादीकडून मिळालेल्या या वागणुकीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भटक्या समाजाने आता डोळे उघडे करुन लोकशाहीकडे पाहिले पाहिजे. शत्रू व मित्र ओळखला पाहिजे. अशी प्रतिक्रिया भाजपचे भटक्या विमुक्त सेलचे धनंजय ओंबासे, बबनराव कांबळे यांनी केले आहे.
(छायाः प्रकाश वायदंडे)
राष्ट्रवादी भवनमध्ये आजही भटक्या समाजाची भटकंती
RELATED ARTICLES