सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी वेगाने सुरु झाली आहे. कोरेगाव, जावली, सातारा, वाई, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, माण, खटाव, कर्हाड, पाटण याठिकाणी 1 हजार 581 अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती देण्यात आली. राष्ट्रवादी भवनात सोमवारी 211 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
सोमवारी निवडणुकीच्या अनुषंगाने वेगाने घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीने फलटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून अबाधित राहिलेला आहे. राज्यात व केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. सातारा शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यत्वाच्या निवडणूक अर्जासाठी तुफान गर्दी झाली आहे. विविध आरक्षणनिहाय अर्ज घेण्यासाठी इच्छुक उमेदवार रांगा लावत आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे नेते चांगलेच सुखावले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील सर्वाधिकार विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे देण्यात आले असल्याने त्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थिती लावली होती. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, पक्षनिरीक्षक सुरेशराव घुले, माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती इदाटे, अशोक गोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँगे्रस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसोबतच भाजप, शिवसेना या केंद्र व राज्यात सत्तेत असणाजया पक्षांनीही दंड थोपटले आहेत. या पार्श्वभूमीवर बंडखोरीला उधाण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.