दै. ग्रामोद्धार सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीत बुधवारी अर्ज छानणीच्या दिवशी दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यापैकी एक अपक्ष तर दुसरा उमेदवार राजकीय पक्षाचा होता. मात्र, त्याला जोडपत्र न दिल्यामुळे त्यांचाही अर्ज अवैध ठरला. दरम्यान, भाजपच्या प्रभाग क्रमांक 15 अ च्या उमेदवार आशा पंडित यांनी साविआ आणि नविआच्या दोन्ही उमेदवारांवर घेतलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांनी फेटाळून लावल्या.
सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली छानणी झाली. यावेळी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण उपस्थित होते. छाननीमध्ये दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे आता एकूण अर्जांची प्रभागातील संख्या 238 तर नगराध्यक्षपदाचे 11 उमेदवार आहेत.
अर्ज छानणीच्या दिवशी जे दोन अर्ज अवैध ठरले आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक 2बफमधील निर्मला पाटील आणि प्रभाक क्रमांक 3अफच्या उमेदवार भारती सोळंकी यांचा अर्ज आहे. निर्मला पाटील यांनी भाजपच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत असताना त्यावर सूचक म्हणून फक्त एकाचीच सही होती. पक्षाने त्यांना जोडपत्र दिले नव्हते. परिणामी त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. मात्र, या प्रभागात भाजपने रीना तानाजी भणगे यांना जोडपत्र दिल्यामुळे त्यांची अधिकृत उमेदवारी निश्चित करण्यात आली. प्रभाक क्रमांक 3 अ च्या उमेदवार भारती सोळंकी यांचा एक अर्ज अवैध ठरविण्यात आला असलातरी त्यांचा दुसरा अर्ज मात्र वैध ठरविण्यात आल्यामुळे त्यांची उमेदवारी या प्रभागातून कायम आहे. सोळंकी यांच्या अर्जावर सूचक म्हणून ज्याची सही होती त्याच सूचकाची सही नीलम अमित रणदिवे यांच्या अर्जावर होती. रणदिवे यांचा अर्ज सोळंकी यांच्यांपूर्वी दाखल झाला होता. त्यामुळे सोळंकी यांचा एक अर्ज अवैध ठरला. मात्र, भारती सोळंकी यांच्या दुसजया अर्जावर सूचक त्याचबरोबर आवश्यक ती माहिती बिनचूक असल्यामुळे त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांनी दिल्यामुळे सोळंकी यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे.
दरम्यान, भाजपच्या प्रभाग क्रमांक 15 अ च्या उमेदवार आशा पंडित यांनी सातारा विकास आघाडीच्या सरिता सुरेंद्र जानकर आणि नगरविकास आघाडीच्या अंजली माने यांच्या उमेदवारी अर्जावर विविध कारणे देत हरकत घेतली. मात्र, त्या हरकती निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांनी फेटाळून लावल्या. जानकर यांचे पती सुरेंद्र जानकर हे सातारा पालिकेचे ठेकेदार असल्यामुळे त्यांच्या पत्नी सरिता जानकर यांचा अर्ज अवैध ठरविण्यात यावा, अशी मागणी उमेदवार आशा पंडीत यांनी केली होती. त्यावर दिवसभर खलबते सुरु होती. याबाबतचा निर्णय रात्रीपर्यंत राखून ठेवला होता. अखेर याबाबत पंडित यांनी दिलेल्या पुराव्यांची शहानिशा नगरपालिकेकडून करण्यात आली. त्यानूसार जानकर हे पालिकेचे ठेकेदार होते आणि त्यांच्याकडे घंटागाडीचा ठेका होता. मात्र, त्याची मुदत 31 मार्च 2016 रोजी संपल्यामुळे ते आता ठेकेदार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला.
नविआच्या उमेदवार अंजली माने या नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये मोडत नसल्यामुळे त्यांचाही अर्ज अवैध ठरविण्यात यावा, अशी तक्रार उमेदवार आशा पंडित यांनी केली होती. मात्र, या प्रभागात फक्त ओबीसीच नव्हे तर एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गातील उमेदवारदेखील अर्ज दाखल करू शकतात, असा नियम असल्यामुळे त्यांचाही अर्ज वैध ठरविण्यात आला.
दरम्यान, छानणीच्या दिवशी सातारा नगरपालिकेत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी सातारा पालिकेत गर्दी केली होती. मात्र, जेथे छानणी होती तेथे उमेदवारांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ( दै. ग्रामोद्धार सातारा )