सातारा : सातारा पालिकेच्या रणसंग्रामात कधीनव्हे ते प्रचंड राजकीय चुरस निर्माण होवू लागली असून 11 तारखेनंतर संपूर्ण सातारा आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने ढवळून निघणार आहे. या रणधुमाळीत 238 उमेदवारांपैकी किमान 114 उमेदवार अपक्ष असून या अपक्षांची मोट कशी बांधायची असा खल शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु झाला आहे.
राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरु पाहणारा उमेदवार कसा थांबवायचा यासाठी साम, दाम, दंड, भेद याची रणनिती सुरु झाली असून प्रस्थापितांचा ससेमिरा टाळण्यासाठी अपक्षांनी सातार्याबाहेर धाव घेतली आहे. अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करुन 40 ची संख्या गाठता येते का यादृष्टीने त्यांच्याकडून चाचपणी सुरु आहे. दोन्ही आघाड्यांकडून अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अपक्ष उमेदवार कोणालाही दाद देण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात चौरंगी, पंचरंगी लढती पहायला मिळणार आहेत.
सातारा पालिकेच्या निवडणूकीसाठी यंदा पहिल्यांदाच विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीत सातारा विकास आघाडी, नगरविका आघाडी, भाजप, शिवसेना, रासप या पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्याशिवाय अनेक प्रभागात मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार, अशी चिन्हे आहेत. अपक्ष उमेदवारांची मोट बांधून नगराध्यक्षपदाचा उमेदवारही अपक्ष उभा करायचा, अशी व्यूहरचना करता येते का यादृष्टीने काही अपक्ष उमेदवार चाचपणी करत आहेत.
अजून त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. त्यामुळे ते त्याबाबत उघड काही बोलण्यास तयार नाहीत. मात्र सर्वच ठिकाणचे अपक्ष एकत्र आले तर एक ताकद तयार होईल आणि सगळ्यांना एकमेकांची मदत मिळेल, असे अपक्षांचे म्हणणे आहे. बहुतांश अपक्षांचे विचार जुळणे अवघड आहे. जर अशाप्रकारे आघाडी अस्तित्वात आली तर पालिका निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होईल.
प्रभार रचना जाहीर झाल्यापासून भाजपने सातारा शहरात चाळीस ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने त्यांनी चाचपणीही सुरु केली होती. सातार्यात दोन्ही आघाड्यांचे मनोमिलन होईल आणि अनेक ठिकाणी उमेदवार आपल्या हाताला लागतील असा त्यांचा अंदाज होता. मात्र, ऐनवेळी मनोमिलन तुटले, त्यामुळे दोन्हीकडून नाराज होणार्यांची मोठी संख्या घटली. त्यामुळे भाजपकडे होणारी मोठी आवक आपोआप रोखली गेली. दोन्ही राजे वेगवेगळे लढत असतानाही भाजपने 32 उमेदवार उभे केले हेही कमी नाही. अजूनही त्यांना आठ ठिकाणी उमेदवार कमी पडत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करुन 40 उमेदवार पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांमध्ये त्यांना किती यश येणार हे आताच सांगता येणे अवघड आहे. दोन्ही राजे वेगवेगळे लढत आहेत. 40-40 जणांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. तरीही नाराजी कमी झालेली नाही. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे.
नाराजीतून अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आपल्याच समर्थकांची नाराजी दूर करुन त्यांचा उमेदवारी अर्ज त्यांना काढावा यासाठी दोन्ही राजांनी प्रयत्न सुरु केले आहेत. तूर्त तरी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले हे नाराज कोणालाही दाद देण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे दोन्ही राजांना अपक्षांची मने वळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
आघाडीच्या संग्रामात अपक्ष कोणाच्या दावणीला
RELATED ARTICLES