विकास कामात उगाच राजकारण करू नका
सातारा : यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियमच्या होणार्या उद्घाटन सोहळ्यात खा. उदयनराजे भोसले यांना डावलण्याचा सुरू झालेला प्रयत्न स्वत: उदयनराजेंनीच शुक्रवारी हाणून पाडला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या दालनासमोरील कॉन्फरन्स रूममध्ये उदयनराजेंनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रशासनाच्या अधिकार्यांची परखड शब्दात चांगलीच परेड घेतली. उगाच विकास कामात राजकारण आणू नका. अन्यथा काय ते समजून घ्या. अशा सुचक इशार्याद्वारे उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या सुचनेवर चालणार्या जिल्हा परिषदेतील काही पोपटांना चांगलेच वठणीवर आणले. राजेंच्या या दणक्याची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा होती. अविश्वास ठरावाच्या नाट्यानंतर आता ऑडिटोरियमच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीने पुन्हा राजकीय खेळ्यांची ओढाताण सुरू केली आहे. उदयनराजे समर्थकांना फार विचारात न घेता कार्यक्रम उरकण्याचे सुरू झालेले प्रयत्न उदयनराजे भोसले यांच्या लक्षात येताच शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या दालनात उदयनराजेंनी दबंग एंट्री केली त्यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, व इतर उपस्थित होते. सर्वच अधिकार्यांना उदयनराजें यांनी बोलावून चांगलेच खडसावले. अधिकार्यांनी अधिकार्यांप्रमाणे काम करावे, विकास कामांमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा पुढे काय होईल …. …? असा इशारा देत उदयनराजे यांनी पॉज घेतला. राजेंच्या या बोलण्याने ज्यांना समजायचे त्यांना समजले. सेस फंडातल्या 4 कोटी निधीची उपलब्धता करूनही काही कामांना सुभाष नरळे यांनी स्थगिती दिल्याने उदयनराजेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काम तातडीने व दर्जेदार पध्दतीने पुर्ण व्हावे. सातारा जिल्हा परिषद यशंवंत विचारांची म्हणायची आणि दुफळीचे राजकारण करायचे हे चालणार नाही असे उदयनराजे यांनी सांगत सगळ्यांनाच परखडपणे समज दिली. शासकीय विश्रामगृहात येवून त्यांनी महसुल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली. अनेक विषयांवर अनौपचारीक गप्पा करत त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. आगाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसदर्भातही दोघांची कमराबंद खलबते झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. नंतर चंद्रकांत दादांनी काही नाही अनौपचारीक गप्पा होत्या असे सांगत वेळ मारून नेली. मात्र आगामी निवडणूका या भाजप स्वबळावरच लढणार अशी घोषणा त्यांनी केली. कमराबंद चर्चेमध्ये उदयनराजे व भाजप यांचे जुने सख्य पुढे आणून सातार्यात नवी समीकरणे पुढे येण्याची चर्चा सुरू झाली आहे.