सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात गेल्या पाच वर्षापासून पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती सातत्याने मागणी करुनही करण्यात आली नाही याची निषेध म्हणून आज आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत समर्थकांनी प्राधिकरणाच्या आवारातच भर पावसात सकाळी 11 वाजता भाजी मंडई भरवून लक्षवेधी आंदोलन केले.
याप्रसंगी आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात कार्यकारी अभियंताच नसल्यामुळे सातारा शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामकाजावर मोठा गंभीर परिणाम झाला आहे. सातारा शहरातील पूर्व भागतील सदरबझार व अन्य विभागात पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. येथील रहिवाशी नागरीक सोशिक आहेत. आत्तापर्यंत त्यांनी पाणी पुरवठ्याबाबत कोणतीच वाकडी भूमिका घेतलेली नव्हती. केवळ पाणी पुरवठ्याची बिले भरुन लोकांना वेठीला धरले जात होते ही बाब सातत्याने लोकांनी माझ्यापर्यंत तक्रारी करुन प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात साकडे घातले होते. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या जीवन प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचार्यांना याबाबत काहीच सोयरसुतक नव्हते. प्राधिकरणाला कारभारीच नसल्यामुळेच व्यथा कोणाकडे मांडायचा हा प्रश्न अनुत्तरीत होता. लोकांचा अंत न पाहता प्रशासनाने येत्या 10 दिवसात पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती केल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला समर्थकांसाठी आम्ही टाळे ठोकू असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिला. या लक्षवेधी आंदोलनाच्यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम पवार, सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, नविआचे पक्ष प्रतोद अविनाश कदम, नगरसेवक भालचंद्र निकम, फिरोज पठाण, पंचायत समिती सदस्या वनिता कण्हेरकर, विलासपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पूर्णवेळ अभियंता नियुक्तीचा प्रस्ताव पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे प्रलंबित असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी आ. शिवेंद्रराजेंना सांगितले.
प्रारंभी प्राधिकरणाच्या प्रवेशद्वारावर ठिकाणी मंडई भरवण्यात येणार होती त्याठिकाणी रस्त्यावरील रहदारी सुमारे 1॥ तास ठप्प झाली आहे. यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्याच्यावतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.