म्हसवड : महायुतीच्या शासनाची नियत साफ नाही, ज्यांना शेतकर्यांची दु:ख माहित नाहीत त्यांना दुष्काळी भागातील वरदान ठरणार्या सिंचन योजना पूर्ण करण्यात स्वारस्य नाही. राज्य शासनाची धोरणे दिशाहीन असून खोट्या आश्वासनाद्वारे सत्तेवर आलेले सरकार शेतकर्यांचे काय हित साधणार असा घणाघात काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
म्हसवड, ता. माण येथे पालिकेच्यावतीने माण गंगेच्या काठावर बांधण्यात आलेल्या अद्ययावत बागेच्या लोकार्पण सोहळ्याच्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निबाळकर, चेतना सिन्हा, सोनिया गोरे, सुवर्णा पोरे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नगराध्यक्ष वसंत मासाळ, उपनगराध्यक्ष रुपाली कोले, मुख्याधिकारी पंडित पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले, ज्यावेळी मी राज्यात नवखा होतो तेव्हा राज्यात जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार म्हणून कोठेही प्रतिनिधीत्व केले नव्हते. राज्याच्या ग्रामीण भागात दौरे करुन नागरिकांचे प्रश्न समजावून घेतले. चार वर्षाच्या आघाडीच्या शासनात मित्र पक्षांनी अनेकवेळा वेगवेगळ्या कामांसाठी धमक्याही दिल्या. पण कोणालाही भिक घातली नाही. दुष्काळी भागातील जनतेने नेहमीच किंमत मोजली आहे. दुसरीकडे धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राजकारण केले. महायुतीच्या शासनाला शेतकर्यांची दु:खे माहित नाहीत. आज राज्यात फडणवीस शासनाला दोन वर्षे पूर्ण झाली. मग त्यांनी आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही. मात्र धनगर समाजाच्या नेत्यांना राजकारण करायचे होते. जिल्ह्यातील धरणे करण्यासाठी निधी उपलब्ध नाही, ऊसाचे दर, डाळीचे दर यांनी टोक गाठले आहे. चुकीच्या कारभारामुळे जनतेचा विश्वास उडाला आहे. 2014 ला चूक झाली ती दुरुस्त करावी लागणार आहे यासाठी अजूनही नगराध्यक्ष थेट का निवडावा हे धोरण समजले नाही. म्हसवड नगरपालिकेमध्ये आ. गोरे यांच्या हाती एकहाती सत्ता द्या, मलकापूरच्या ऐवजी म्हसवड नगरपालिकेने विकासाचा झेंडा लावला असा गवगवा सर्वत्र होऊ द्या, म्हसवड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची ताकद आ. जयकुमार गोरे यांच्यामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना मनापासून साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
आ. गोरे म्हणाले, पृथ्वीराज बाबा राज्याचे मुख्यमंत्री नसते तर माणमधील विकासाचे चित्र आम्हाला पाहायला मिळाले नसते. म्हसवड जे बदलले ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच 1857 च्या पालिकेमध्ये साधी स्मशान भूमी सुध्दा उभारण्यात आली नाही याला जबाबदार कोण? मी पाच वर्षे सत्ता मागितली त्यावेळी सांगितले होते ही जबाबदारी मी घेतो? आणि तो शब्द पृथ्वीराज चव्हाण यांनी खरा करुन दाखविला. 48 वर्षाचा अनुशेष भरुन काढायचा होता. मात्र कुठेही विकासकामांमध्ये चुका केल्या नाहीत तरी विरोधक चौकशीची मागणी करतात. विरोधकांकडे लक्ष न देता म्हसवड शहराच्या विकास करणे हे आमचे अंतिम उद्दीष्ट आहे असे सांगून आ. गोरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले.