सातारा : राज्यातील युतीच्या संसारात विकासकामांवरुन शिवसेना व भाजप यांच्यात भांडणतंटा सुरु असून मंत्रालयात सध्या प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्या सातारा जिल्ह्याची अनेक विकासकामे प्रलंबित राहिली असून त्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्याची नेमणूक हा विषय सुध्दा मागे पडला आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मनोमिलनाने पाठपुरावा करुनही अद्याप लोणीकरांनी सातार्यासाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता देण्याचे मनावर घेतलेले नाही. अधिवेशनाचे निमित्त करुन मंत्रीमहोदयांनी प्रस्तावाची फाईल कुलूप बंद ठेवल्यानेच सातारकरांना प्राधिकरणाच्या उफराट्या कारभाराला तोंड देण्याची वेळ आली आहे.
शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सेना मंत्र्यांची कामे होत नसल्याचा आरोप करुन फडणवीस शासनाला पाठिंबा काढून घेण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. युतीच्या या भांडणामध्ये सातारा जिल्ह्यातील विकास कामांचे प्रस्ताव सातत्याने लांबणीवर पडत असून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वगळता राष्ट्रवादीच्या अन्य आमदारांनी मंत्रालयात जाणेच सोडून दिले आहे. जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था तसेच जलस्वराज अभियान या दोन्ही कामांसाठी वित्त विभागाने अर्थ पुरवठ्याचा हात आखडता घेतल्याने तसेच तीर्थक्षेत्र स्थळाच्या विकासासाठी 50 मीटरची मर्यादा निश्चित करण्यात आल्याने सातारा जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणार्या सातारा शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अद्यापही पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळालेला नाही. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पंधरवड्यापूर्वी प्राधिकरणाच्या कार्यालय परिसरात मंडई भरवून 10 दिवसात कार्यवाही न झाल्यास हे कार्यालय पूर्णवेळ बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र आंदोलन झाले, आंदोलनाचा फार्स झाला मात्र ना अभियंता मिळाला, ना प्राधिकरण सदस्य सचिवांची वेळ.
संगीत खुर्चीचा खेळ कायम
या सार्या गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा दैनिक ग्रामोध्दारने प्रयत्न केला असता काही गोष्टींचा उलगडा झाला. मुळात पुणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता वैशाली आवटे यांच्याकडेच अद्याप कार्यभार असून त्या आंदोलन झाल्यापासून त्यांच्या कार्य व्यस्ततेमुळे अद्यापही सातार्याला फिरकल्या नाहीत. प्रभारी अभियंता वि. ल. कुलकर्णी यांना सातार्याच्या कोणत्याही दुरुस्त्या, गळती अथवा नवीन कनेक्शनचे प्रस्ताव याच्या फाईली घेवून सातारा-पुणे वारी करावी लागत आहे. प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार यांचा प्राधान्य क्रमाने पूर्णवेळ अभियंत्यासाठी प्रयत्न सुरु असताना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी निर्णय देण्यास टाळाटाळ चालवली आहे.
प्रश्न सातार्याचा अन् मंत्री महोदय नगरमध्ये !
रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय कारभारात अहमदनगर विभागाचा मोठा वाटा आहे. सातारा व नगर या दोन जिल्ह्यांचे ऐतिहासिक संबंधही सर्वश्रुत आहेत. मात्र सातार्याची कामे बाजूला ठेवून मंत्री महोदय बबनराव लोणीकर काही दिवस मंत्रालयात तर काही दिवस नगरमध्ये तळ देवून आहेत. खा. उदयनराजे भोसले यांनी अभियंत्याच्या मागणीसाठी चार पानी सविस्तर प्रस्ताव लोणीकर यांना भेटून दिला होता. मंत्री महोदयांची अपॉईंमेंटची यादी भलतीच मोठी असल्याने पूर्णवेळ नियुक्तीची कामे किरकोळीत काढण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. मुळात बदली सत्राचा मे महिना निघून गेला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विशेष परवानगीचे गरज आहे असे शासकीय व छापील कारण मंगळवारी मंत्रालयातून देण्यात आले. त्यामुळे कार्यकारी अभियंता सातार्याला मिळणे ही पुन्हा एकदा अडथळ्याची शर्यत ठरणार आहे. म्हणजे राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच आपल्या हक्कांसाठी पुन्हा फडणवीस शासनाशी नव्याने भांडण करावे लागणार आहे. शिवेंद्रराजेंच्या टाळेठोक आंदोलनाचे पुढे काय झाले तर खासदारांच्या तुलनेत प्राधिकरणाचा प्रश्न हाताळून जे राजकीय संतुलन साधायचे होते ते साधून घेण्यात आले. कण्हेर पाणी पुरवठा योजनेतही दोन्ही भावांमध्ये असेच कुरघोड्यांचे राजकारण चालले होते. प्राधिकरणाच्या या प्रश्नातही अशीच ईर्षा चालू आहे. सध्या तरी लोणीकर मंत्री महोदय सातारकरांना लोणकढी थाप ठोकून बेपत्ता झाल्याने सातार्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा वनवास संपलेला नाही.
पाणी पुरवठा मंत्र्यांना नाही सातार्यासाठी वेळ
RELATED ARTICLES