सातारा : राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती फार्मजवळील जिल्हा परिषदेच्या मालकीची मोकळी जागा सातारा पालिकेला कृत्रिम तलाव करण्यासाठी हस्तांतरीत करायला जिल्हा परिषदेने नकार दिला आहे तसे लेखी सोमवारी पालिकेला कळवण्यात आल्याने प्रशासनाची एकच धावपळ झाली. पालिकेच्या तयारीला या नकारामुळे जोरदार झटका बसला आहे.
पालिकेच्यावतीने तब्बल 44 लाख रुपयांचे कृत्रिम तळे तयार करण्याचे नियोजन सुरु झाले होते. उच्च न्यायालयाने ऐतिहासिक तळ्यांमध्ये श्री विसर्जनाला बंदी घातल्याने सातारा शहरात श्री विसर्जनांचा गतवर्षी प्रश्न ऐरणीवर आला. पालिकेने हा प्रश्न कृत्रिम तळ्याद्वारे सोडवला. मात्र त्यासाठी 58 लाख रुपये खर्ची पडला. दरवर्षी पालिकेकडून जागेसाठी होणारा जाच टाळण्यासाठी मालकीच्या जागा कोणालाही देवू नये असा ठराव सातारा जिल्हा परिषदेने केला. याच ठरावाच्या आधारावर सोमवारी पालिकेला स्पष्ट नकार देण्यात आला. तसे विनंती पत्र जिल्हाधिकार्यांच्या सूचनेवरुन पालिकेने दि. 14 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेला सादर केले होते. मात्र तेथून चक्क नकार आल्याने पालिकेसमोरील पेच वाढला आहे. हा पेच कसा सोडवायचा यासाठी बांधकाम विभागाचे पर्याय शोधणे सुरु झाले असून याचाच एक भाग म्हणून मुख्याधिकारी शंकरराव गोरे हे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची भेट घेणार आहेत. या भेटीत जिल्हाधिकार्यांनी या प्रश्नी पुढाकार घ्यावा अशी मांडणी कदाचित केली जाईल. किंवा शहरातील तळ्यांमध्ये विसर्जन करण्याची परवानगी मागितली जाईल.