युवकाचा प्रामाणिकपणा, सर्व स्तरातून कौतुक
सातारा : शाहुपूरी येथे पोलीस ठाण्यानजीक आयडीबीआय बँकेचे एटीएम सेंटरमध्ये सापडलेले 15 हजार रू. रोख एका युवकाने प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात जमा करून अद्याप माणुसकी जीवंत असल्याची जाणीव करून दिली. अमित सुरेश सपकाळ रा. शाहुपूरी असे रक्कम जमा करणार्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी 10.45 च्या सुमारास अमित सपकाळ हा युवक शाहुपूरी पोलीस ठाण्या नजीकच्या आयडीबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला 15 हजार रू.ची रोकड एटीएमच्या मशीनमधील कॅश ड्रॉवरमध्ये आढळली. त्याने ती रक्कम घेऊन तात्काळ शाहुपूरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांकडे जमा केली.
पोलीसांनी तात्काळ आयडीबीआय बँकेशी संपर्क साधून ही रक्कम कोणी काढली व त्याची माहिती घेतली त्यावेळी बँकेने ही रक्कम चंद्रकांत श्रीनिवास हौसताडे यांची असल्याचे सांगितले. पोलीसांनी हौसताडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची रक्कम त्यांना सुपुर्त केली. अमित सपकाळच्या प्रामाणिकपणा बद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे