ढेबेवाडी : कुंभारगाव (ता. पाटण) येथे यात्रेच्या निमित्त ठेवलेल्या तमाशा कार्यक्रमात काही युवकांनी केलेल्या दंग्यामुळे झालेल्या गोंधळाचा परिणाम चक्क हाणामारीत होऊन गावात तणाव निर्माण झाला. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा असून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
तमाशात युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीवरुन सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन गावांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पाचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करत दांडक्याने मारहाण केली. घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांना मारहाण करत साहित्यांची तोडफोड केली. यामध्ये पाच पोलिसांसह वीसहून जास्त जखमी झाले. ही घटना कुंभारगाव-चाळकेवाडी येथे घडली.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारगावच्या लक्ष्मीदेवी यात्रेचा रविवारी (ता. 5) मुख्य दिवस होता. यात्रेनिमित्त शनिवारी सायंकाळी तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तमाशावेळी काही युवकांनी नृत्यांगणांना खडे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांमध्ये बाचाबाची झाली. यात्रेचा मुख्य दिवस रविवारी होता. दिवसभर यात्रा सुरळीत पार पडली. मात्र, सायंकाळी काही युवकांमध्ये पुन्हा हमरीतुमरी झाली. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करत वादावार तात्पुरता पडता टाकला.
दरम्यान, सोमवारी सकाळी दोन्ही गावांना जोडणार्या मुख्य रस्त्यावर युवक आमने-सामने आले. त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी दोन्ही गावांतील सुमारे पाचशेपेक्षा जास्त जणांचा जमाव त्याठिकाणी जमला. जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करत मिळेल त्या वस्तूंनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाच्या दगडफेकीत पाच पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
मारामारी सुरू असताना युवकांचा जमाव कुंभारगावात घुसला. युवकांनी काही घरांमध्ये घुसून तेथील साहित्यांची तोडफोड करीत महिला, मुले व यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण केली. या मारामारीत वीसहून अधिक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कर्हाडच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे दोन्ही गावांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचे गंभीर्य ओळखून पाटण पोलिस उपअधीक्षकानी घटनास्थळी भेट दिली.