मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज : प्रांताधिकारी श्रीरंग तांबे

 

पाटण:- ४५ सातारा लोकसभा मतदार संघ व २६१ पाटण विधानसभा मतदार संघासाठी २०१९ लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असुन मंगळवार दि. २३ रोजी होणाऱ्या ३९७ मतदान केंद्रासाठी २ हजार २१५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर १५० जीपसह विविध गाड्या, ४ ट्रक, ४४ एसटी बस असे एकूण १९८ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. मतदान करताना मतदाराला छायाचित्र असणारे ११ पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. जनतेने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. निवडणूक कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला अथवा आचार संहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.*

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रामहरी भोसले, निवडणूक नायब तहसीलदार चौगुले, मंडल अधिकारी पी. एच.  शिंदे, तलाठी भरत जाधव, निवडणूक कर्मचारी शकील मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रांताधिकारी श्रीरंग तांबे माहिती देताना पुढे म्हणाले, ४५ सातारा लोकसभा मतदासंघ आणि २६१ पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण ३९८ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये कराड तालुक्यातील (३९४ अ) पाडळी केसे या सहाय्यक मतदान केंद्रांचा समावेश आहे.  मतदारसंघात १ लाख ५० हजार ३०६ पुरूष मतदार आणि १ लाख ४७ हजार ७७४ महिला व तृतीयपंथी १ मतदार असे एकूण २ लाख ९७ हजार ७८१ मतदार आहेत. त्यापैकी १ हजार ४८४ दिव्यांग मतदार आहेत.

निवडणूककामी क्षेत्रिय अधिकारी ४८, राखीव क्षेत्रिय अधिकारी १२ असे एकूण ६० अधिकारी नेमण्यात आले आहेत.  प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, एक सहाय्यक केंद्राध्यक्ष, एक सहाय्यक, शिपाई व पोलीस कर्मचारी असे एकूण ६ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. ४० कर्मचारी राखीव ठेवले असून २ हजार २१५ कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. यासाठी एकूण ५०८ मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामध्ये ३९८ यंत्रांसह इतर ११० यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच ३९७ बीएलओ, ३९८ आशा सेविका व ३९८ स्वयंसेवक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रांवर आशा सेविकांमार्फत औषधांचे कीट उपलब्ध करण्यात आले आहेत. लहान बाळासह मतदानासाठी आलेल्या स्त्री मतदारांना अंगणवाडी सेविकेमार्फत पाळणा घराची सोय करण्यात आली आहे.

मतदान प्रक्रियेसाठी १० भरारी पथके, ४ स्थिर (तळमावले, निसरे, कोयनानगर, तारळे), व्हिडीओ सर्विलन्स ३, व्हिडीओ व्हीव्ही टीम १ अशा एकूण १८ पथकांची नेमणूक केली आहे. मतदान यंत्रे व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी १५० जीपसह विविध गाड्या, ४ ट्रक, ४४ एसटी बस असे एकूण १९८ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. अपंग मतदारांसाठी ९० ऍटोरिक्षांची सोय करण्यात आली असून २२१ व्हिल चेअरची सोय केली आहे. तसेच येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात मतदान यंत्र वाटप व स्विकारण्यासाठी एकूण २७ टेबल ठेवण्यात आले असून त्यासाठी १३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

४५ लोकसभा मतदारसंघातील ३९८ मतदान केंद्रांपैकी १० टक्के प्रमाणे सुमारे ४० मतदान केंद्रांवर ऑनलॉईन यंत्रणा बसविण्यात आली असून त्यामार्फत प्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच ईव्हीएम मशिन वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस बसविण्यात येणार आहे.

मतदान करताना मतदाराला ११ छायाचित्र असणारे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, शासनाचे कार्ड, बॅंक पासबूक, पॅनकार्ड, आधारकार्ड, स्मार्ट कार्ड, मनेरेगा (रोजगार) कार्ड, हेल्थ कार्ड, इन्श्युरन्स कार्ड, पेन्शन कार्ड या ओळखीच्या पुराव्यांचा समावेश असल्याची माहिती देवून निवडणूक कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला अथवा आचार संहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शेवटी श्रीरंग तांबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

सखी मतदान केंद्र :-
लोकसभा निवडणुकीत यावर्षी प्रथमच सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार पाटणमधील केंद्र नं. १३९ बाळासाहेब देसाई महाविद्यालयात सखी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रावर केंद्राध्यक्षासह सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.*