58 व्या गळीत हंगामास सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्या हस्ते प्रारंभ
रेठरे बुद्रुक : गेल्या हंगामात कृष्णा कारखान्याने सभासदांना विनाकपात 3220 रूपये दरासह 60 किलो मोफत साखर देऊन देशात दुसर्या नंबरचा दर दिला आहे. येत्या गळीत हंगामातही सभासदांना इतर कारखान्यांच्या तुलनेत जास्तच दर देणार असल्याची घोषणा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली. कृष्णा कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, चेअरमन डॉ. सुरेश भोसले, व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हा परिषद सदस्या सौ. शामबाला घोडके, सौ. प्रियांका ठावरे, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी उमेश शिंदे आदी मान्यवरांसह संचालकांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामास प्रारंभ करण्यात आला.
यानंतर झालेल्या सभेत बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की सभासदांना अधिकाधिक दर मिळावा आणि कारखान्याची प्रगती व्हावी यासाठी आमचे संचालक मंडळ व प्रशासन नियोजनबद्धरित्या काम करत आहे. यंदा आम्ही डिस्टलरीचे आधुनिकीकरण करण्यास प्रारंभ केला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांची अंमलबजावणी केली जात असल्याने प्रदूषणाला पूर्णपणे आळा बसणार आहे. जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत कारखान्याने साडेतीन हजार एकर क्षेत्रात एकरी 100 टन ऊस घेण्याचा प्रयत्न केला असून, या प्रयत्नाला यंदाच्या हंगामात चांगले यश मिळेल, असा विश्वास आहे.
जिल्हाधिकारी श्री. काळम-पाटील यांनी कारखान्याच्या वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करून, कृष्णा कारखान्याने राबविलेले अनेक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. डॉ. सुरेश भोसले यांच्य कुशल नेतृत्वामुळे कारखान्याची प्रगती होत असून, पर्यायाने सभासदांनाही चांगला लाभ मिळत असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
गेल्या काळातील संचालक मंडळ आणि सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीतील फरक सभासदांच्या लक्षात येत असून, आप्पासाहेबांच्या काळातील उच्चांकी दर देण्याची परंपरा सुरेशबाबांनीही जपली असल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले. सुरेशबाबांनी कारखान्याची सुत्रे हाती घेतल्यापासून अगदी पहिल्या बैठकीपासूनच अनेक धाडसी निर्णय घेत, राज्यातील अन्य सहकारी साखर कारखान्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. संघर्षातून उभं राहण्याची आमची परपंरा असून, संघर्षातूनच नवी उर्मी घेऊन चांगली वाटचाल होते यावर आमचा ठाम विश्वास आहे. यंदा कारखान्याची रिकव्हरी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक असल्याने, कृष्णा कारखाना एक नंबरचा दर देईल, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रारंभी कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील व त्यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी पाटील यांच्या हस्ते श्री वरदविनायक पूजा करण्यात आली. कार्यक्रमाला संचालक जगदीश जगताप, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, पैलवान शिवाजीराव जाधव, जितेंद्र पाटील, दिलीपराव पाटील, संजय पाटील, सुजीत मोरे, गिरीश पाटील, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, माणिकराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, अॅड. बी. डी. पाटील, बाळासाहेब लाड, रघुनाथ मोहिते, एल. एम. पाटील, शिवाजीराव थोरात, प्रसाद पाटील आदी मान्यवरांसह सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.